आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Food Rate Hiking Effect Milk Production In Trouble

खाद्याचे दर वाढल्याने दूध उत्पादक शेतकरी अडचणीच्या फे-यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तालुक्यातील शेतकरी दुष्काळाची भीषण झळ सोसत असताना शेतीला पूरक जोडधंदा असलेला दुग्धव्यवसाय अडचणीच्या फे-यात सापडला आहे. चारा, पाणीटंचाईच्या संकटाबरोबर सुग्रास खाद्याच्या वाढलेल्या दरामुळे दुग्ध व्यवसायाची वाट अवघड होत चालली आहे. उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असताना दुधाचे दर आणखी घसरण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यात या रखरखत्या दुष्काळात जनावरांचा चारा, खाद्य आणि त्यासाठी करावी लागणारी मेहनत विचारात घेता दुधाचे घसरलेले दर शेतक-यांच्याच मुळावर आले आहे. त्यामुळे जनावरे सांभाळणेही मुश्कील झाले आहे. दूध व्यवसाय कोलमडला तर शेतक-यांची आर्थिक परिस्थिती खालावणार असून सरकारचे मात्र याकडे दुर्लक्ष दिसत आहे.

शेतीचा पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडे पाहिले जाते. शेतीतील अन्य खर्च भागून शेतक-यांना आर्थिक ताकद देणारा हा व्यावसाय आता मात्र अडचणीत सापडला आहे. दुधाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शेतकरी खर्च कसा भागवायचा या विवंचनेत आहेत. सध्या जनावरे सांभाळणेही खर्चिक बनले आहे. त्यांना दररोज चारा, खाद्य देताना शेतक-यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यातूनही दुष्काळावर मात करत त्यांनी जनावरे सांभाळून फायदेशीर दूध व्यवसाय करण्याची चिकाटी कायम ठेवली आहे. सध्या तालुक्यातून साठ हजार लिटरपेक्षा अधिक दूध संकलन होते. जनावरांसाठीच्या खाद्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

चांगल्या खाद्याचे एक पोते ९०० ते १००० रुपयांपर्यंत आहे. कमी पावसाने घरचा चार निघाला नसल्याने चा-यासाठीही पैसे खर्च करावे लागत आहेत. अशातच बाजारपेठेतील दुधाची मागणी कायम असताना दर घसरले कसे? या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. ज्या प्रमाणात दुधाचे दर घसरले त्या प्रमाणात खाद्याचे दर कमी झालेले नाहीत.

त्याचबरोबर जनावरांचा औषधांसह अन्य खर्चही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे दरातील घसरणीने शेतक-यांना घातलेल्या खर्चाचा ताळमेळ बसणे अवघड झाले असून, खर्चही निघणार नाही, अशी स्थिती असल्याचे तालुक्यातील शेतक-यांनी सांगितले आहे.

900 ते 1000रुपयांपर्यंत चांगल्या खाद्याचे एक पोते
जनावरे सांभाळणे झाले डोईजड
सध्या दूध दर, खर्च याचा विचार केला तर शेतक-यांना या दुष्काळात जनावरे सांभाळणेही मुश्कील होणार आहे. त्यातून जर दूध व्यवसाय कोलमडला तर शेतक-यांचे अर्थकारण कोलमडून या व्यवसायाला उभे करणे अवघड जाईल. हा व्यवसाय सावरण्यासाठी शासनाने तातडीने दूध व्यवसायाला आर्थिक हातभार देणे गरजेचे आहे. मात्र, सरकार अजून म्हणावे तसे स्थिरावले नसल्याने त्यांचा राजकीय गुंता सुटता सुटत नसल्याने शेतकरी नाहक दुष्काळाच्या आणि राजकारण्यांच्या खाईत सापडला आहे.

दुधाचे दर कमी झाले म्हणून जनावरांना लागणा-या खाद्याचे दर कमी होत नाहीत. शेतक-यांना वाढीव दरानेच खाद्य खरेदी करावे लागते. शेतक-यांना हा खर्च न परवडणारा आहे. हा व्यवसाय सुरू ठेवण्या-यास शासनाने खाद्यासाठी अनुदान द्यावे.

नानासाहेब थोरे, दूध उत्पादक शेतकरी.
एकीकडे जिल्ह्यात दुष्काळ, तर दुसरीकडे दुधाचे घसरणारे दर यामुळे दूध व्यवसाय करावा तरी कसा हेच कळत नाही. माझ्याकडे चार गाई होत्या; परंतु खाद्याच्या वाढत्या किमती व चा-याचा प्रश्न असल्याने आज माझ्यावर तीन जनावरे विकण्याची वेळ आली आहे.
सोमनाथ गवळी, शेतकरी