आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यवहार ऑनलाइन असणार; गरीब नव्हे, श्रीमंतांना बाहेर काढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गरिबांसाठी कोणतीही योजना आली की तुम्ही गरीब आहात हे सिद्ध करावे लागते. मात्र, अन्न सुरक्षा विधेयकात नेमके उलटे आहे. नुकत्याच झालेल्या जनगणनेत श्रीमंतांची यादी शासनाकडे उपलब्ध आहे. त्यामुळे शहरी भागातील 50 टक्के व ग्रामीण भागातील 25 टक्के श्रीमंतांना बाजूला करून उर्वरित सर्व जण या योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत. ही योजना नेमकी कशी असेल, याची सामान्यांना उत्सुकता आहे.

75 टक्के ग्रामीण जनतेला या योजनेचा लाभ द्यायचा असे ठरवण्यात आले आहे. त्यामुळे गावागावातील 25 टक्के श्रीमंतांना वगळले की उर्वरित सर्वांना या योजनेचा लाभ दिला जाईल. शहरी भागात 50 टक्के श्रीमंतांना वगळले की उर्वरित सर्व जण या योजनेत आपोआप येतील.

दारिद्रय़रेषा हद्दपार : या विधेयकाने दारिद्रय़रेषाच संपुष्टात आणली आहे. रेशन कार्डही संपुष्टात येत असून त्याऐवजी एटीएम कार्डसारखे एक कार्ड दिले जाईल. त्याची ऑनलाइन नोंद असेल. कुटुंबप्रमुखाची बायोमेट्रिक नोंदणी सुरू झाली आहे. त्यामुळे कदाचित कार्ड सोबत नसले तरीही धान्य मिळू शकेल. त्याचबरोबर तुम्ही दुसर्‍या शहरात गेलात तरीही धान्य घेता येईल. सध्या ठरलेल्याच दुकानातून धान्य घेता येते.

गॅसची टाकी, दुचाकी असणार्‍यांना दारिद्रय़रेषेखालील यादीतून वगळण्यात येत होते. मात्र, या वेळी तशी कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. श्रीमंतांच्या यादीत तुम्ही नाही म्हणजेच तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहात.

तरीही तुम्ही आहात लाभार्थी : दुचाकी, यंत्र, किसान क्रेडिट कार्ड, तुमच्या घरातील एखादा शासकीय कर्मचारी असला तरी तुम्ही लाभार्थी असाल, शासनाकडे नोंदणीकृत संस्था, मासिक दहा हजारांपर्यंत उत्पन्न, तुम्ही व्यवसाय किंवा उत्पन्न कर भरत असाल तरी चालेल. घरात फ्रीज, एसी, मोबाइल, लँडलाइन फोन, अडीच एकर सिंचनाची किंवा 5 एकर कोरडवाहू जमीन.

कुणी किती घेतले धान्य; जिल्हाधिकारी पाहणार
ऑनलाइन नोंदणीमुळे सहा दुकानांपैकी तीन दुकाने नेटद्वारे जिल्हाधिकार्‍यांशी जोडली गेली आहेत. कोणत्या व्यक्तीने किती किलो तांदूळ किंवा गहू घेतले हे जिल्हाधिकारी आयपॅडवर पाहू शकतात. भविष्यात सर्वच दुकाने अशा पद्धतीने जोडली जाणार आहेत. त्यामुळे लाभार्थींशिवाय अन्य कोणीही धान्य खरेदी करू शकणार नाही, असा दावा जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी केला आहे.

स्वस्त धान्य दुकानदारांना घरपोच धान्य
सद्य:स्थितीत स्वस्त धान्य दुकानदारांना गोदामातून धान्य आणावे लागते. त्यासाठी वाहतुकीचा खर्च त्यांनाच करावा लागतो. मात्र, नव्या योजनेत हा खर्च त्यांना करावा लागणार नाही. शासनातर्फे दुकानापर्यंत धान्य पोहोचते केले जाईल.

असे मिळेल धान्य
लाभार्थी कुटुंबाला प्रती व्यक्ती 5 किलो धान्य मिळेल. यात पुढील तीन वर्षांसाठी तांदूळ 3 रुपये, गहू- 2 रुपये आणि भर धान्य (मका, डाळ) प्रति किलो 1 रुपये या दराने मिळेल.