आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत फुटपाथवर खासगी, सरकारी अतिक्रमण; पायी जाणार्‍यांची बिकट वाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'शहरातील वाहतुकीचा खेळखंडोबा झालेला असतानाच फुटपाथची वाटही बिकट झाली आहे. विशेष म्हणजे खासगी अतिक्रमणाबरोबरच पालिकेनेच फुटपाथवर 39 बस थांबे बांधले आहेत. कहर म्हणजे यातील काही बस थांब्यांवर इतरांना कब्जा केला आहे. त्यामुळे अतिक्रमणावर अतिक्रमण झाल्याचे भन्नाट चित्र आहे. डीबी स्टारने यावर कोरडे ओढल्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्तांनी फिरते पथक तयार केले. मात्र, आता पथक पंक्चर झाल्याने काही दिवसांपुरताच हा ‘शो’ चालला... '

मनुष्यबळाचा तुटवडा असल्याचे तुणतुणे मनपा वाजवते... पोलिसांचेही सहकार्य आवश्यक असल्याचे अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख म्हणतात. पुन्हा एकदा स्वतंत्र भरारी पथक स्थापन करण्याचा प्रस्ताव देणार, असे म्हणत त्यांनी शिळ्या कढीलाच ऊत आणण्याचा प्रयत्न चालवला आहे. परिणामी पादचार्‍यांसाठी असणारे फुटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात गायब झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना गर्दीचा, तर पादचार्‍यांना अपघाताचा धोका आहे.
पादचार्‍यांच्या सोयीसाठी व वाहतूक अबाधित राहावी यासाठी फुटपाथ उभारले जातात. मनपाने 10 वर्षांपूर्वी शहरातील प्रमुख रस्त्यांवर फुटपाथ निर्माण केले, पण काही दिवसांतच या बहुतांश फुटपाथवर अनेकांनी कब्जा केला. कुणी टपर्‍या टाकल्या, कुणी दुकाने थाटली, कुणी हॉटेल्स उभारले, तर अनेक ठिकाणी रिक्षा स्टँड निर्माण झाले. काहींनी बांधकाम साहित्य टाक ले, अनेक फुटपाथचा वापर वाहनांची र्पाकिंग म्हणून होत आहे. हे कमी की काय, खुद्द मनपानेच तब्बल 39 फुटपाथवर बस थांबे उभारले आहेत. विशेष म्हणजे या थांब्याचाही उपयोग होत नाही. कारण त्यात इतरांनीच अतिक्रमण केले आहे. एवढे होऊनही मनपाचे फुटपाथवरील अतिक्रमणाकडे लक्ष नाही.

भरारी पथकही झोपले
या समस्येवर डीबी स्टारने 11 ऑक्टोबर 2013 रोजी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दुसर्‍याच दिवशी तातडीने बैठक घेऊन कुठल्याही फुटपाथवर अतिक्रमण होऊ नये म्हणून स्वतंत्र व कायमस्वरूपी फिरते भरारी पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, पण प्रत्यक्षात प्रारंभी देखाव्यापुरते या पथकाचे काम चालले आणि काही दिवसांतच हे पथक थंडावले. परिणामी अतिक्रमणधारकांनी पुन्हा फुटपाथ कब्जात घेतले. चमूने शहरातील प्रत्येक कोपर्‍यात जाऊन पाहणी केली तेव्हा बहुतांश फुटपाथची हीच अवस्था असल्याचे लक्षात आले.
काय आहेत अडचणी

अतिक्रमण हटाव विभागात मनुष्यबळ कमी
शहरातील फुटपाथचा श्वास मोकळा करण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमण विभागात पुरेसे मनुष्यबळ नाही. याउलट या पथकातील बरेच कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. 1988 नंतर नवीन नोकरभरती झालीच नाही. 15 लाख लोकसंख्येसाठी केवळ 15 लेबर, 4 इमारत निरीक्षक, 2 जुनाट वाहने, 4 कारकून,
प्रशासकीय अधिकारी आणि एक विभागप्रमुख आहेत.

अतिरिक्त भार
आधीच कर्मचार्‍यांचा तुटवडा, त्यात अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांच्याकडे सिडकोचे उपायुक्त आणि अग्निशमन या दोन विभागांचा अतिरिक्त भार आहे. नवीन व जुन्या शहरासाठी दोन प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यापैकी एक बी. के. गायकवाड यांच्याकडे वॉर्ड ‘ड’चे शाखा अभियंता व नवीन शहर सिडकोच्या अतिक्रमण विभागाचे प्रशासकीय अधिकारी या दोन पदांचा भार आहे, तर दुसर्‍या प्रशासकीय अधिकारी प्रियंका केसरकर यांच्याकडे धोकादायक इमारती,अनधिकृत बांधकामे यांचा भार वाढल्याने त्याही फुटपाथकडे फारसे लक्ष देत नाहीत, तर संपूर्ण शहरासाठी असलेल्या चार इमारत निरीक्षकांच्या खांद्यावर अनधिकृत बांधकामांचा भार खांद्यावर असल्याने शहरातील फुटपाथ दुर्लक्षित होत आहेत.

काय आहेत उपाय
फुटपाथवरील अतिक्रमण व पुन्हा त्यावर कोणी कब्जा करू नये यावर देखरेख करण्यासाठी जुन्या व नव्या शहरात स्वतंत्र दोन भरारी पथके स्थापन करावीत.
> प्रत्येक पथकात पालिकेचे तीन कर्मचारी, एक पोलिस निरीक्षक व एक वाहन, असा ताफा असावा.
> हॉकर्स झोन उभारावा. शहरात शहानूरवाडी एकता चौकातील चौपाटीच्या धर्तीवर फुटपाथवर दुकानदारी थाटणार्‍यांसाठी हॉकर्स झोन उभारावेत, या झोनमध्ये दुकानदारी सुरू करण्याचा परवाना देण्यात यावा.
> घाटी परिसरात फूड प्लाझा उभारावा - अनेक वर्षांपासून शहरातील घाटी मार्गावर असलेल्या फुटपाथवर चहा-नाष्ट्याच्या टपर्‍या, फळविक्रेत्यांचे ठेले उभे आहेत; पण रुग्णांची यामुळे सोय होते. ग्राहक मिळत असल्याने गाडीवाले पुन्हा पुन्हा कब्जा करतात. उपयोगी आहे. त्यामुळे येथील फुटपाथचा श्वास मोकळा करण्यासाठी रुग्णालयाच्या आत फ्रुूट व फूड प्लाझा उभा करावा.
> शहरातील औरंगपुरा, सेव्हन हिल्स, सिडको बसस्थानक ते चिकलठाणा, सिडको बसस्थानक ते हर्सूल टी पॉइंट या मार्गावर मूर्तिकार, फुलझाडे विक्रेत्यांनी फुटपाथवर जागा कमी पडू लागल्याने रस्त्यावरच कब्जा केला आहे. त्यामुळे या लोकांसाठी पालिकेच्या ओस पडलेल्या भूखंडावर सोय करण्यात यावी.
> वॉर्डनिहाय समिती-शहरातील फुटपाथवर लक्ष ठेवण्यासाठी वॉर्डनिहाय एक समिती असावी, यात प्रत्येक प्रभागातील तीन जागरूक नागरिक, उपअभियंता, प्रभाग अधिकारी, स्वच्छता निरीक्षक व पालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला समिती प्रमुख करावे.
> शहरातील प्रत्येक 15 मीटर रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथ असावेत. सात ते नऊ मीटर रस्त्यावर नसावेत.
> पुण्याचा घ्यावा आदर्श-पुण्यात सायकल ट्रॅक, दुचाकी, चारचाकी अशा विभागवार लेन आहेत. त्यायोग्य फुटपाथही उभारले आहेत. याची मात्र आपल्या शहरात उणीव आहे.
> वाहतूक शाखा आणि मनपाचा याबाबत योग्य समन्वय असावा.

या फुटपाथवर कब्जा
> जळगाव रस्ता ते हर्सूल टी पॉइंट
> घाटी मार्ग ते महेमूद दरवाजा
> एन-चार, राजे शिवछत्रपती महाविद्यालय ते कामगार चौक ते उच्च् न्यायालय
> सिडको बसस्थानक ते सार्वजनिक बांधकाम विद्युत विभाग कार्यालय
> सेव्हन हिल्स ते गजानन महाराज मंदिर मार्ग
> लक्ष्मण चावडी ते सिल्लेखाना चौक
> हेडगेवार रु ग्णालय ते गजानन मंदिर
> अमरप्रीत ते शहानूरवाडी एकता चौक
> महावीर चौक ते मध्यवर्ती बसस्थानक ते ज्युबली पार्क
> गोपाल टी ते स्टेशन मार्ग

थेट सवाल: शिवाजी झनझन, प्रमुख, अतिक्रमण हटाव विभाग

शहरातील फुटपाथवर अतिक्रमण झाले आहे.
होय मान्य आहे. यासाठी स्वतंत्र पथक निर्माण करणे, घाटी परिसरात स्वतंत्र फूड प्लाझा, प्रभागनिहाय हॉकर्स झोन, कर्मचारी संख्या वाढवण्याबाबत दोन वर्षांपासून प्रस्ताव दिलेले आहेत. वरिष्ठ पातळीवर विचार व्हावा.

मध्यंतरी तत्कालीन आयुक्त डॉ. भापकरांनी स्थापन केलेली समिती कुठे गेली?
ही समिती तीन महिन्यांसाठी होती. या वेळी बहुतांश फुटपाथवरील अतिक्रमण काढले होते आणि आजही कारवाई चालू आहे. मात्र, हे लोक कारवाईनंतर पुन्हा येऊन बसतात.
कायमस्वरूपी काय उपाय करणार ?
जुन्या व नव्या शहरात स्वतंत्र पथक निर्माण करण्यासाठी व हॉकर्स झोन, फूड प्लाझा उभारण्याचे पुन्हा नव्याने प्रस्ताव दाखल करणार आहे. हाच एकमेव उपाय आहे. पालिका कर्मचारी दुपारी साडेपाचपर्यंत कारवाई करू शकतात. मात्र, रात्री पोलिसांना कारवाई करायला हवी. वाहतूक पोलिस आणि मनपा कर्मचारी दोन्ही मिळून कारवाई झाली पाहिजे.

आमची जबाबदारी नाही
फुटपाथवरील टपर्‍या हटवणे हे आमचे काम नाही. यासाठी मनपात स्वतंत्र पथक आहे. फुटपाथवरील वाहनांवर सातत्याने आम्ही कारवाई करत असतो. त्याबाबत यापुढेही आम्ही काळजी घेऊ.
-अजित बुर्‍हाडे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

स्वतंत्र पथकच हवे
शहरात किमान 60 ते 100 फुटांच्या रस्त्यावर फुटपाथ असावेत. अनेक ठिकाणी ड्रेनेज,जलवाहिनी दुरुस्तीसाठी फुटपाथ खोदले जातात. त्यावरील पेव्हर ब्लॉक लांबवले जातात. फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी शहरात तीन पथके तैनात करावीत. त्यांना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार द्यावेत.
-सी. एस. सोनी, माजी शहर अभियंता, मनपा

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, औरंगाबादेतील फुटपाथची अवस्था...