आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Dialogues With Youths Sana Iqubal Travel 40 Passengers Km

तरुणाईशी संवाद साधण्यासाठी एकटीच गाठणार ४० हजार किमीचा पल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - समाजात एकीकडे मुलींना 'सातच्या आत घरात' येण्याचा दंडक आहे, तर दुसरीकडे हैदराबादची सना इक्बाल एकटीच बुलेट घेऊन भारतभ्रमणावर निघाली आहे. हा प्रवास ती हौसेने करत नसून प्रवासाच्या मार्गात येणाऱ्या शाळा-महाविद्यालयांत जाऊन ती तरुणाईला तणावमुक्त जीवनाचे धडे देत आहे. तिने सहा महिन्यांत देशात ४० हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचा निश्चय केला असून प्रवासातील पहिला टप्पा तिने औरंगाबादेत पूर्ण केला आहे.
मानसशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकणारी सना व्यवसायाने कॉर्पोरेट ट्रेनर आहे. ती सातवीत असतानाच दुचाकी चालवायला शिकली. तिचे दुचाकीचे वेड बुलेटपर्यंत पाेहोचले. आता तर ती याच वाहनाने भारतभ्रमंतीवर निघाली आहे. यापूर्वी तिने देशात कमी पल्ल्याचा प्रवास एकटीनेच केला. यातूनच तिला आपण देशभर प्रवास करू शकू, असा आत्मविश्वास निर्माण झाला. मात्र, प्रवासाच्या हौसेने फिरण्यापेक्षा त्याला काही उद्देश असावा म्हणून विविध प्रांताचे लोक, त्यांच्या समस्या, तरुण-तरुणींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा तिने निर्धार केला आणि प्रवासाला निघाली.

तरुणाईला जगण्याचे प्रोत्साहन : देशातीलएकूण आत्महत्यांपैकी सर्वाधिक आत्महत्या तरुण मुले-मुली करतात. प्रेमभंग, छेडछाडीला कंटाळून होणाऱ्या आत्महत्येच्या आकड्यांनी ती व्यथित झाली. मानशास्त्राचीच विद्यार्थिनी असल्याने अशा विषयांत अधिक रस असल्याचे ती सांगते. मात्र तरुणाईला जगण्याचे प्रोत्साहन देण्यासाठी तिने एकटीने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. ितच्या निर्णयाला घरच्यांनी मोठा विरोध केला. पण आपली भूमिका तिने त्यांना पटवून दिली. प्रवासादरम्यान स्वत:ला हानी पोहोचणार नाही, याचा विचार करूनच तिने प्रवासाचे नियोजन केले आहे. सोमवारी ती शहरातील काही महाविद्यालये शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार अाहे. इंदौर, भोपाळ हा तिच्या प्रवासाचा दुसरा टप्पा आहे.

रायडिंगमुळे सकारात्मक ऊर्जा : बाईकराइडिंग (दुचाकी स्वारी) आपल्यातील नकारात्मकता, निराशा दूर करते. मी स्वत: अनेकदा निराश, नकारात्मक असताना बाईक राइडिंग केली. याने सकारात्मक ऊर्जा मिळाली असे ती सांगते. एखाद्या मुलीने बुलेट चालवणे आश्चर्यकारक समजले जाते. परंतु पुढील दहा वर्षांत मुलांप्रमाणेच मुलीही अवजड वाहने चालवतील, असा विश्वासही सनाने व्यक्त केला.

समोरच्याची एवढी लायकी पाहा : सध्याप्रेमभंग, फसवणूक, छेडछाडीमुळे मुला-मुलींचे आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु आत्महत्येपूर्वी ज्याच्यासाठी आपण आत्महत्या करतो त्याची तेवढी लायकी आहे का, याचा नक्की विचार करावा. आधी स्वत:ची किम्मत करावी, जे झाले ते विसरणे शक्य नसते. परंतु जगात अनेक चांगल्या गोष्टींच्या मदतीने आपण दुखा:पासून दूर जाऊ शकतो, असा आत्मविश्वासही सनाने व्यक्त केला.

शहरात जंगी स्वागत
शहरातील बुलेटप्रेमींच्या'थ्रॉटलर्स ग्रुप'ने तिचे रविवारी सायंकाळी जंगी स्वागत केले. या वेळी डॉ. सत्यजित पाथ्रीकर, योगेश लोंढे, प्रकाश ताखरे, राहुल औसेकर, निरंजन जहागीरदार, संदीप मुळे, विनय देव, आशिष शर्मा, संजय आरोरा, हेमंत बेडसे, रमेश हरणे, नंदकुमार कराड, मंदार कुलकर्णी, मनीष दंडगवाल, अनिला दंडगवाल, डॉ. पवन शर्मा, श्रीकांत जोशी, नीलेश देवकर, चैतन्य राजूरकर यांची उपस्थिती होती.