आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • For Farmers Question Across The State Rasta Rocko On 9 December Devendra Padanvis

शेतक-यांच्या प्रश्नांवर 9 डिसेंबरला राज्यात सर्वत्र रास्ता रोको करणार - देवेंद्र फडणवीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतक-यांच्या प्रश्नांवर 9 डिसेंबरला राज्यात सर्वत्र रास्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली. भाजपच्या विभागीय मेळाव्यानंतर मंगळवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. आदर्शच्या अहवालाबाबत मुख्यमंत्री भ्रष्टाचाराला पाठीशी घालत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी या वेळी केला.
ते म्हणाले, विदर्भ व मराठवाड्यामधील शेतक-यांच्या नुकसानीबाबत भरपाई मिळत नाही. मात्र, सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील सत्यशीला पृथ्वीराज चव्हाण यांना नुकसानभरपाई मिळते. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला नुकसानभरपाई आणि ज्यांचे नुकसान झाले आहे त्या वर्धा जिल्ह्यातील शेतक-यांना 80 आाणि अकोल्यातील शेतक-यांना 275 रुपयांचे चेक मिळाले.
पॅकेजच्या माध्यमातून नुकसानभरपाईचे चेक देऊन मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांची चेष्टा केल्याचा आरोपही त्यांनी केला. नागपूरमध्ये होणा-या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरणार आहे. विदर्भात पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही त्याची भरपाई देण्यात सरकारने दुर्लक्ष केले आहे. आयोगाने कापूस, सोयाबीन आणि धानाच्या बाबतीत सुचवलेले हमी भाव शेतक-यांना मिळत नाहीत. कापसाला सात हजार रुपये भाव दिला, तरी कापूस परवडत नाही. एकीकडे खरिपात नुकसान झाल्यानंतर रब्बीचे पीक घ्यायचे ठरवले, तर वीज कापण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे या अधिवेशनात सरकारला धारेवर धरण्याचा इशाराही त्यांनी दिला. पत्रकार परिषदेला संभाजीराव पाटील, पाशा पटेल, सुरजितसिंह ठाकूर, गणेश हाके उपस्थित होते.
...केळकर समितीचा अहवाल स्वीकारणार नाही : अनुशेष काढण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल अधिवेशनात येण्याची शक्यता आहे. अनुशेष काढताना केळकर समितीने तालुका हा घटक ग्राह्य धरल्यास हा अहवाल स्वीकारणार नाही. अनुशेष काढण्यासाठी विभागीय घटकच ग्राह्य धरण्याची गरज आहे. जादूटोणा कायद्यासंदर्भात भाजपचा पाठिंबा आहे. श्याम मानव यांच्या सोबत झालेल्या बैठकीत कलम 3 मध्ये स्पष्टता येण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
आदर्शप्रकरणी उच्च न्यायालयात पीआयएल : आदर्शप्रकरणी अंतरिम अहवालात जिथे ठपका ठेवण्यात येत आहे, तोच दाबून ठेवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. मुख्यमंत्री भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालत असल्यामुळे अहवाल मांडण्यात चालढकल होत आहे. त्यामुळे या विरोधात उच्च न्यायालयात पीआएल दाखल केली असून पाच तारखेला सरकारला त्याचा खुलासा द्यायचा आहे.
केंद्राचा चुकीचा पायंडा
तेलंगणामध्ये हिंसक आंदोलन झाल्यानंतर केंद्र सरकारने वेगळे राज्य देत चुकीचा पायंडा पाडला. विदर्भाबाबत लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू आहे. त्यामुळे हिंसक आंदोलन केले, तर वेगळे राज्य मिळते, असा संदेशच या पायंड्यावरून मिळतो.