आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नॅक’च्या आशेने सिंह यांना ‘दीक्षांत’चे निमंत्रण, दर्जा घसरू नये म्हणून विद्यापीठाचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५६ वा दीक्षांत समारंभ सुटीच्या दिवशी म्हणजेच रविवारी (२७ मार्च) सकाळी साडेदहा वाजता आयोजित केला आहे. माजी कुलगुरू तथा नॅकचे संचालक डॉ. डी. पी. सिंह दीक्षांत समारंभाचे पाहुणे आहेत. वास्तविक यंदाचा दीक्षांत समारंभ डॉ. आंबेडकरांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील असल्यामुळे जागतिक नव्हे तर किमान राष्ट्रीय कीर्तिवंतांना निमंत्रित करणे अपेक्षित होते. पण दुधाची तहान ताकावर भागवावी लागल्याचा विद्यापीठीय प्राध्यापकांचा सूर आहे. शिवाय डॉ. सिंह यांच्या माध्यमातून २०१८ मधील नॅक पुनर्मूल्यांकनात दर्जा घसरू नये, असे प्रशासनाला वाटत आहे.

मागील वर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्रांचा अनुग्रह केला. यंदा मात्र अनेक महिन्यांपासून पाहुण्यांच्या शोध सुरू होता; पण विद्यापीठ प्रशासनाला यूजीसीच्या नॅक समितीचे संचालक डॉ. सिंह यांच्यावरच समाधान मानावे लागले. बामुटा या विद्यापीठीय प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी परीक्षा नियंत्रक डॉ. वाल्मीक सरवदे यांनी सिंह हे दीक्षांत समारंभाला शोभणारे पाहुणे नसल्याची टिप्पणी केली आहे. त्याशिवाय काही संवैधानिक अधिकारीदेखील यंदाच्या दीक्षांत समारंभावर नाराज आहेत.

दीक्षात समारंभाला आजवर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, यशवंतराव चव्हाण, तत्कालीन राज्यपाल के. शंकरनारायण, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, अनिल काकोडकर, ज्येष्ठ कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. पी. कुरुलकर, नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. सुखदेव थोरात, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अरुण निगवेकर, डॉ. राम ताकवले, तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आदींसह अनेक मोठ्या व्यक्ती हजर राहिल्या आहेत.

पाहुणा मिळत नसल्याचे सिद्ध झाले
या वर्षी डॉ. आंबेडकरांच्या जयंतीचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या दीक्षांत समारंभाला देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रित करणे गरजेचे होते. पण नॅकच्या संचालकांना बोलावून पाहुण्यांची वानवा असल्याचे सिद्ध झाले. डॉ. वाल्मीक सरवदे, अध्यक्ष,बामुटा

२०१८ मध्ये नॅकचे पुनर्मूल्यांकन
तत्कालीनकुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या कार्यकाळात २०१३ मध्ये विद्यापीठाला नॅकचे ‘अ’ मानांकन मिळाले आहे. आता डॉ. चोपडे यांच्या काळात २०१८ मध्ये नॅकचे पुनर्मूल्यांकन होणार आहे. आपल्या काळात नॅकचा दर्जा घसरू नये म्हणून डॉ. चोपडे डॉ. सिंह यांच्या माध्यमातून सॉफ्ट कॉर्नर तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा विद्यापीठात आहे.
बातम्या आणखी आहेत...