आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक कोंडी करणारे २९ दुभाजक बंद होणार, अग्रसेन चौकानंतर अन्य रस्त्यांवरही होणार बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वाहतूक कोंडीचे कारण ठरणारे विविध रस्त्यांवरील २९ दुभाजक बंद होणार असून अन्य रस्त्यांवरही काही बदल केले जाणार आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. सिडको उड्डणापुलावरून वाहतूक सुरू झाल्यानंतर अग्रसेन चौक बंद करण्यात आला असून कॅनॉट परिसरातून छत्रपती महाविद्यालय आणि सिडको एन-२ कडे जाणाऱ्या वाहनधारकांना सिडको चौकातून यू टर्न घेऊन एन-२ च्या दिशेने जावे लागणार आहे. याबाबत पुढील आठ दिवस आक्षेप आणि सूचना नोंदवण्यात येतील. त्यानंतर या चौकाबाबत कायमचा निर्णय घेण्यात येईल, असे सहायक पोलिस आयुक्त सी. डी. शेवगण यांनी सांगितले. मे महिन्यातच हा चौक बंद केला होता. मात्र, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या आग्रहास्तव पुन्हा सुरू करण्यात आला होता, असेही त्यांनी सांगितले.

काय आहेत निरीक्षणे? : पोलिसांचा सर्व्हे, वाहतूकतज्ज्ञांच्या सूचनेनुसार पूल संपताच दोन्ही दिशांना मोठा उतार आहे. वाहने वेगात असतात. त्यामुळे उड्डाणपूल संपतो त्या ठिकाणी दुभाजक नसावा, असे पोलिसांच्या सर्वेक्षणात म्हटले आहे. बाबा पेट्रोल पंपाजवळ झालेला उड्डाणपूल बसस्थानकाच्या दिशेने कामगार आयुक्तालयांच्या समोर संपतो त्या ठिकाणी असलेला दुभाजकही बंद करण्यात आला आहे. अग्रसेन चौक बंद केल्यामुळे अलीकडे असलेल्या हायकोर्ट चौकातील ताण वाढणार आहे. या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी सिग्नलची दुरुस्ती करून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

नागरिकांचा पुढाकार गरजेचा : जालना रोडवर रोज किमान दोन गंभीर अपघात होतात. दरमहा किमान एक व्यक्ती कायमची जायबंदी होते किंवा मृत्युमुखी पडते. रविवारी रात्री (१९ जून) एसएफएस शाळेसमोर रस्ता ओलांडणाऱ्या ३५ वर्षांची वर्षा आणि तिचा भाऊ रोहन यांना भरधाव दुचाकीस्वाराने उडवले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी नको असलेले उड्डाणपुलाला लागून असलेले दुभाजक बंद करावे लागणार आहेत.

२५ चौकांत सिग्नल आवश्यक : शहरातील अजून २५ पेक्षा अधिक चौकात सिग्नलची आवश्यकता आहे, तर काही सिग्नल दुरुस्त करणेही गरजेचे आहे. सध्या वाहतूक विभागातील सुमारे २५० कर्मचारी अधिकारी शहराची वाहतूक व्यवस्था पाहतात. याशिवाय जालना रोड आणि बीड बायपास रोडवर होणारी वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी स्वतंत्र चार्ली पथक आहे. याशिवाय वाहतुकीची कोंडी करणारे २९ दुभाजक बंद करण्यात येणार आहेत. यातील बहुतांश दुभाजक बंद असून आकाशवाणी चौकाबाबतही लवकरच निर्णय होणार आहे

मुकुंदवाडी ते बाबा २० मिनिटे पुरेशी
४०च्या गतीने निघालेल्या दुचाकीस्वाराला अवघ्या २० मिनिटांत मुकुंदवाडी ते बाबा पेट्रोल पंप हे आठ किलोमीटरचे अंतर पार करता येणार आहे. यापूर्वी या अंतरासाठी किमान ३० मिनिटे लागत होती. मोठ्या चौकातील सिग्नलवर दोन वेळा थांबावे लागत होते. चार उड्डाणपुलांमुळे या अंतरास २० मिनिटे लागतात. यादरम्यान चार सिग्नल लागतात.
बातम्या आणखी आहेत...