आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदेशी पाहुण्यांनी इटेवाडी तांडा खेड्यात येऊन शिकवला भूगोल !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोलंबिया, स्वीडन, हंगेरी आणि फ्रान्स येथून आलेल्या पर्यटकांनी औरंगाबादजवळच्या इटेवाडी तांडा या गावात येऊन विद्यार्थ्यांना जगाचा भूगोल शिकवला. तसेच गिटार कशी वाजवायची यासह दिवसभर तुंबलेल्या नाल्या व गाव स्वच्छ करण्याच्या मोहिमेत भाग घेतला. गावातील लग्नातील वरातीतही भारतीय संगीताच्या तालावर ठेका धरला.
औरंगाबाद येथील किरण वैष्णव हा युवक मागील पाच वर्षे युरोप खंडात शिक्षण घेत होता. न्यूझीलंडमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तेथेच पाच वर्षे नोकरी केली. त्यानंतर अनेक देशांत फिरताना कमालीची स्वच्छता दिसली. त्या तुलनेत भारतात मात्र कचरा निर्मूलनावर काम होत नसल्याचे लक्षात आले. कचरा व्यवस्थापनावर काम करण्यासाठी तो भारतात परतला. मराठवाड्यातील नांदेड येथील रहिवासी असलेला किरण औरंगाबादेत स्थायिक झाला. त्याने एक सामाजिक संस्था स्थापन करून त्याद्वारे ग्रामस्वच्छतेवर काम सुरू केले.
विदेशी जेव्हा भारतात पर्यटनासाठी येतात तेव्हा त्यांना ग्रामीण भागातील साधे राहणीमान आवडते. मात्र, गावातील अस्वच्छता पाहून ग्रामीण पर्यटनास जाणे टाळतात. हीच बाब हेरत किरण याने मागील दोन वर्षांपासून विदेशी पाहुण्यांना ग्रामीण भागातील स्वच्छता मोहिमेवर काम करण्यासाठी हाक दिली. त्यांच्या या हाकेस त्याच्या संपर्कात आलेल्या विदेशी मित्रांनी प्रतिसाद देत भारतातील ग्रामीण भागात काम करण्याची संमती दिली. यंदा कोलंबिया येथून लॉरा व डियानो या दोन मुली, तर स्वीडनमधून नाचो हा तरुण आला. त्यांनी पळशी रोडवरील इटेवाडी तांडा या निसर्गरम्य गावास भेट दिली.

गिटारवरच्या तालावर नाचण्यास पाडले भाग

आम्ही नेमके काेठून आलो आहोत हे इटेवाडीतील विद्यार्थ्यांना समजावे यासाठी त्यांनी जगाचा नकाशा समोर ठेवून त्यांचा देश आणि तुमचं गाव कोठे आहे हे दाखवले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात गिटारवर विदेशी संगीताच्या तालावर नाचण्यास भाग पाडले. गावकऱ्यांनी विदेशी पाहुण्यांचा झुणका-भाकरीचा पाहुणचार दिला. त्यानंतर दिवसभर गावकऱ्यांसोबत कुदळ, फावडी घेऊन स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.