आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आय अॅम सॉरी... इंडिया इज रिअली ग्रेट,आदरातिथ्याने फ्रेंच पर्यटकाचे भारताविषयी मत बदलले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - बंगळुरूला कसे जायचे, कोणी सांगत नाही. वायफाय नसल्याने घरच्यांशीही संपर्क होत नाही. चांगले जेवणही मिळालेले नाही... फ्रान्सहून आलेला एक सायकलस्वार पर्यटक अशाच अनेक समस्यांनी त्रस्त होता. यामुळे भारताविषयी त्याच्या मनात वाईट प्रतिमा निर्माण झाली. मात्र, विद्यापीठातील दोन तरुणांनी त्याचे म्हणणे एेकले. खिशात पैसे नसताना त्यास जेवू घालून मदतीचा हात दिला. "अतिथी देवो भव'च्या या अादरातिथ्याने भारावलेल्या या पर्यटकाने "आय अॅम सॉरी, इंडिया इज ग्रेट' असे म्हणत पुढील मार्गाकडे प्रयाण केले.
लॉरेन लव्हेयू हा चाळिशीतील फ्रेंच पर्यटक सायकलवरून जगाची भ्रमंती करत आहे. सोमवारी तो मुंबईहून विमानाने औरंगाबादेत आला. येथून त्याला सायकलने बीड, उस्मानाबाद, ढोकी या मार्गाने बंगळुरूला पोहोचायचे होते. विमानतळाहून बीडला कसे जायचे हे लक्षात आल्यामुळे लॉरेल चुकून शहरात पोहोचला. येथे त्याने अनेक जणांना विचारणा केली. पण भाषेचा अडसर तसेच बंगळुरूला नेमके कसे जायचे हे माहीत नसल्यामुळे त्यास कोणी माहिती दिली नाही. रात्र झाल्याने त्याने रेल्वेस्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये जेवण केले. पण ते मनाजोगे नाही मिळाले. वायफाय नसल्याने त्याचा घरच्यांशी संपर्क नाही झाला. यामुळे तो प्रचंड वैतागला. रात्री त्याने स्टेशनजवळील एका लॉजमध्ये मुक्काम केला.

मंगळवारी तो परत बंगळुरू मार्गाच्या शोधात वैतागलेल्या अवस्थेत जालना रोडवर आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पर्यावरणशास्त्र विभागात शिकणारा गजानन पाटील आणि यूपीएससीची तयारी करणारा तेजस पुजारी यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी लॉरेनची विचारपूस केली तसा तो आणखीच भडकला. भारतीयांविषयी तक्रारीचा सूर आळवू लागला. दोन जागतिक वारसास्थळे असतानाही येथील लोक सहकार्य करत नाहीत. माहिती सांगत नाहीत. जेवणही सुमार मिळाले. शहरात कोठेच ओपन वायफाय नाही, अशा तक्रारींचा पाढाच त्याने वाचला. यापुढे माझ्या मित्रांना औरंगाबादेत येऊ नका, असे सांगणार असल्याचे तो म्हणाला. औरंगाबाद आणि देशाबाबतच्या या अनुद््गारांमुळे गजानन आणि तेजसला धक्का बसला. त्याला मदत करायची, असे दोघांनी ठरवले.
हॉटेलातजेवण : लॉरेनलाघेऊन ते क्रिम्स अँड क्रंच या हॉटेलमध्ये गेले. गजानन आणि तेजस यांच्या खिशात केवळ दोनशे रुपये होते. मेन्यू कार्डावरील दर खूप अधिक होते. देशाविषयक लॉरेनचे मत बदलण्यासाठी गरज पडली तर भांडे घासू, असे त्यांनी मनोमनी ठरवले. लॉरेनने एक डिश ऑर्डर केली. ती बजेटबाहेरची होती. त्यांची तगमग क्रिम्स अँड क्रंचचे संचालक रमण कपूर यांनी बरोबर ओळखली. त्यांनी जवळ येऊन चौकशी केली. देशासाठी दोन्ही मुलांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले. वाटेल ते खा, प्या, बिलाची काळजी करू नका, असे कपूर म्हणाले. स्वत: अनेक देशांत भ्रमंती केल्यामुळे कपूर यांना लॉरेन याच्याशी संवाद साधणे सोपे गेले. त्यांनी त्याला वायफायही ओपन करून दिले. तसेच त्याला बंगळुरूचा मार्गही सांगितला. दोन तासांच्या आदरातिथ्याने भारावलेल्या लॉरेनने ‘आय अॅम सॉरी... इंडिया इज रिअली ग्रेट' असे उद‌गार काढले. सर्वांचे आभार मानत त्याने पुढील प्रवास सुरू केला.

आदरातिथ्य करणे हीच संस्कृती
पाहुण्यांचे स्वागत करणे, त्यांचे आदरातिथ्य करणे ही अापली संस्कृती आहे. आपण अतिथीला देवासमान मानतो. मात्र, त्रस्त झाल्यामुळे लॉरेनच्या मनात औरंगाबाद आणि देशाविषयी वाईट प्रतिमा निर्माण झाली होती. ती दूर करण्यासाठी आम्ही त्याला मदत केली आणि त्याचे मत बदलले. यासाठी हॉटेल मालकाचेही सहकार्य मिळाले. - गजानन पाटील, विद्यार्थी,पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ
बातम्या आणखी आहेत...