Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Forest Department Recruitment Issue Aurangabad

वनविभाग भरतीत दोन तास मुलाखती बंद

प्रतिनिधी | Sep 30, 2011, 07:01 AM IST

  • वनविभाग भरतीत दोन तास मुलाखती बंद

औरंगाबाद - वनविभागातील वनरक्षकपदाच्या भरतीमधील गैरप्रकारांसंबंधीचा जाब विचारण्यासाठी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट व आमदार किशनचंद तनवाणी आज प्रादेशिक वनसंरक्षक विभागाच्या कार्यालयावर धडकले. त्यामुळे मुलाखत प्रक्रिया दोन तास ठप्प झाली.
वनसंरक्षक विभाग मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. ओल्या पार्टीपासून ते चालण्याच्या परीक्षेत उमेदवारांना मोटारसायकलवर बसून नेण्यापर्यंतचे अनेक प्रकार भरतीच्या दरम्यान उघडकीस आले. वनविभागातील एका कर्मचा-याने कार्यालयाच्या गाडीवर चालक असलेल्या कर्मचा-याच्या मुलास चालण्याच्या परीक्षेत मोटारसायकलवर बसवून नेण्याचा प्रकार केला. गिरी नामक गार्डला निलंबित करण्यात आले. भरतीमध्ये अनेक उमेदवारांच्या गुणात व समांतर आरक्षणात मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर विभागाने तक्रारदार उमेदवारांसाठी 22 सप्टेंबरला सुनावणी ठेवली. या सुनवाईत विभागाकडे 167 अर्ज आले. त्यातील 125 उमेदवार सुनवाईत आले. यातील 10 ते 15 अपात्र उमेदवारांना समितीने पुन्हा पात्र ठरविले. दोन दिवसांपासून मुलाखती व शारीरिक परीक्षा सुरू आहे. या परीक्षेत वजन कमी असल्याच्या कारणावरून आतापर्यंत 50 उमेदवारांना वगळण्यात आले. मेरिटमध्ये आलेले उमेदवार वजनात गळाले.
वनविभागाने तीन उमेदवारांना अपात्र ठरविल्याने आज शिवसेना आमदार शिरसाट, तनवाणी व नगरसेवक राजू वैद्य, विजय वाघचौरे हे मुलाखतस्थळी धडकले. विभागाने अपात्र ठरविलेल्या उमेदवारांना कारण स्पष्ट केले नसल्याचा या आमदारांचा आरोप होता.
आमदारांनी शिफारस केलेल्या उमेदवारांची स्थिती
1) हरेराव उप्पलवाड यास कराटे खेळाचे प्रमाणपत्र असताना अपात्र ठरविले. उप्पलवाडक डे शासनाने मान्यता प्रदान केलेल्या खेळांचे प्रमाणपत्र नव्हते. कराटे या क्रीडा प्रकाराशी संबंधित खेळ असल्याचे उमेदवाराच्या वतीने सांगण्यात आले.
2) कांता लक्ष्मण धर्मे यांनी महिला राखीव प्रवर्गातून अर्ज सादर केला होता. अर्ज सादर करताना त्यांनी नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केले नव्हते त्यामुळे त्यांना अपात्र घोषित केले.
3) रेखा जयसिंग गोठवाल यांना नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात आले. त्यांनी दाखल केलेले प्रमाणपत्र कालबाह्य झालेले होते. या अपात्र उमेदवारांना कार्यालयाच्या आत येऊ दिले नाही. या तिघांनी आमदारांकडे तक्रार केल्यानंतर आमदारांनी आज वनविभागाचे कार्यालय गाठले.
भरतीमधील आक्षेप
१> चालण्याच्या स्पर्धेतील उमेदवारांची निवड संशयास्पद
२> स्पर्धा संपल्यानंतर गुण दाखविले नसल्याची उमेदवारांची तक्रार
३> यादी लावताना पात्र उमेदवारांना पडलेले गुण दाखविले नाही.
४> एकास तीन उमेदवार मुलाखतीस पात्र ठरविताना आरक्षणनिहाय उमेदवारांची पात्रता यादी लावली नाही.
५> समांतर आरक्षणाचा घोळ कर्मचा-यांच्या लक्षात आला नाही व तक्रारदारांना पटवून सांगण्यास अपयश आल्याने संशय अधिक बळावला.
> प्रमाणपत्रांची यादी करण्यात आली नाही. अर्ज केल्यानंतर उमेदवार कुठल्या प्रमाणपत्राआधारे त्याचे नाव वगळले याचे स्पष्टीकरण दिले नसल्याने घोळ वाढला.
अय्यर यांचे स्पष्टीकरण- उप्पलवाड यांनी सादर केलेले प्रमाणपत्र शासकीय परिपत्रकाप्रमाणे मान्यतापात्र खेळाचे नाही. महिला उमेदवारांना उशिरा मुलाखतीचे पत्र पाठविल्याने गोंधळ उडाल्याचे स्पष्टीकरण प्रादेशिक वनसंरक्षक मेईपोक्कीम अय्यर यांनी केले.

Next Article

Recommended