आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Forest Office Employee Salary Pending Aurangabad

वनपरिक्षेत्र कर्मचार्‍यांचा नोव्हेंबरचा पगार थकवला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वनपरिक्षेत्र विभागातील तब्बल 160 कर्मचार्‍यांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन डिसेंबर महिला संपत आला तरी झालेले नाही. या सर्वांचे एकूण 30 लाख रुपये वेतन तांत्रिक अडचणीमुळे थकले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यामुळे सर्व कर्मचार्‍यांची गैरसोय होत आहे. हे सर्व नवीन भरती झालेले कर्मचारी असून लवकरच त्यांना वेतन देण्यात येईल, असे अधिकारी सांगतात.

असा निघतो पगार
रेंजर फॉरेस्ट ऑफिसर अर्थात वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या स्वाक्षरीने पगाराची बिले निघतात. हे अधिकारी दरमहा या बिलावर सही करून ते रोखपालाकडे पाठवतात. मात्र, रोखपाल वैद्यकीय रजेवर असल्याने नोव्हेंबर महिन्याचे पगार रखडल्याचे येथील कर्मचारी दबक्या आवाजात सांगतात. रोखपाल हजर नसल्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांनी बिलेच पाठवली नाहीत. त्यामुळे हा सर्व गोंधळ निर्माण झाल्याचे कर्मचारी सांगतात. या सर्व 160 कर्मचार्‍यांमध्ये 106 वनमजूर आहेत. तसेच फॉरेस्ट गार्ड, फॉरेस्टर लिपिक हेदेखील त्यात आहेत. यातील वनमजुरांना सर्वाधिक फटका बसला आहे.

जबाबदारी कुणाची ?
पगारपत्रके कोशागारात कुणी वेळेवर पाठवायची, यावरून कर्मचार्‍यांत वाद असल्याचे दिसून आले. वनपरिक्षेत्र अधिकारी जबाबदार की रोखपाल? या वादात कर्मचारी भरडले जात आहेत. कर्मचार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार रोखपाल शंकर राठोड हे वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे ही जबाबदारी वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांची आहे. नाव प्रसिद्ध न करण्याच्या विनंतीवर कर्मचार्‍यांनी सांगितले की, हे सर्व 160 कर्मचारी जून 2012 रोजीच सेवेत कायम झाले. जून 2012 ते ऑक्टोबर 2013 पर्यंतचे वेतन कसे निघाले? नोव्हेंबर महिन्याचे वेतनच कसे थकले, असा सावल कर्मचारी करत आहेत.

माझे ऑपरेशन झाले आहे
या संपूर्ण प्रक्रियेत माझा काहीच दोष नाही. कारण मी वैद्यकीय रजेवर आहे. माझ्या डोळ्यांचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे पगारपत्रके इतर कुठल्याही कर्मचार्‍याने कोशागाराला पाठवायला हवी होती. ही जबाबदारी वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांचीच आहे.- शंकर राठोड, रोखपाल, वनपरिक्षेत्र कार्यालय

थेट सवाल: आर. एस. दसरे, वनपरिक्षेत्र अधिकारी
तुमच्या विभागातील कर्मचार्‍यांचे पगार थकले आहेत काय ?
होय, हे खरे आहे.
30 लाखांचे पगार बिल कोशागाराला का पाठवले नाही ?
ही तांत्रिक अडचण आहे. नव्याने 160 लोकांची भरती एक वर्षापूर्वीच झाली आहे. मात्र, त्यांची सर्व महिती ऑनलाइन मुंबईला पाठवण्याचे काम सुरू असल्यामुळे पगारपत्रकांना उशीर झाला. लवकर हे पगार केले जातील.