आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॉर्म स्वीकारा अन्यथा मान्यता रद्द करू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बहिस्थ विद्यार्थी म्हणून परीक्षा देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांचे 17 नंबर फॉर्म न स्वीकारणार्‍या महाविद्यालयांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. फॉर्म स्वीकारा अन्यथा मान्यता रद्द करण्याच्या कारवाईला सामोरे जा, अशा कठोर शब्दात बोर्डाने या मुजोर महाविद्यालयांना धारेवर धरले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहिस्थ विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका, अशी सूचनाही बोर्डाने केली आहे.

काही कारणांमुळे 10 वी आणि 12 वीची बोर्ड परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बोर्डाच्या वतीने बहिस्थ विद्यार्थी योजना राबवली जाते. या अंतर्गत 17 नंबरचा फॉर्म भरून बहिस्थ विद्यार्थी म्हणून बोर्डाची परीक्षा देता येते. विद्यार्थ्याने कोणत्याही शाळेतून दहावी केली असली तरी तो कोणत्याही महाविद्यालयात अर्ज करू शकतो; परंतु महाविद्यालये हा अर्ज स्वीकारण्यास नकार देत विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेत. डीबी स्टारने याबाबत स्टिंग ऑपरेशन करून 15 जुलैच्या अंकात ‘17 नंबर फॉर्मसाठी 1760 चकरा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले.

महाविद्यालयांच्या मुजोरीमुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी याचे स्वागत केले, तर महाविद्यालयांनी हे फॉर्म स्वीकारणे आपले काम नसल्याचे म्हटले आहे. कागदपत्रे तपासणे, फीसचे पैसे बँकेत जमा करणे आदींसाठी मनुष्यबळ नसल्याचे सांगत त्यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रय} केला. महाविद्यालयांच्या या धोरणामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

बोर्डानेच घेतला समाचार : डीबी स्टारने या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा केला. त्याची गंभीर दखल घेत बोर्डाचे विभागीय सचिव पी. एस. पठारे यांनी 17 जुलै रोजी सर्व महाविद्यालयांना एक प्रगटन पाठवून महाविद्यालयाच्या बेजबाबदार वर्तनाचा कठोर शब्दात समाचार घेतला. या प्रगटनात बोर्ड म्हणते.. ‘काही कनिष्ठ महाविद्यालये खासगीरीत्या प्रविष्ठ होऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी आवेदनपत्रे स्वीकारत नाहीत, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा महाविद्यालयांना सूचित करण्यात येते की, त्यांनी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यार्थ्यांना असहकार करणार्‍या महाविद्यालयांची मंडळ मान्यता व शासनमान्यता रद्द करण्याची शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात येईल.’ यावरूनच बोर्डाने कडक शब्दात महाविद्यालयांना इशारा दिल्याचे स्पष्ट होते.


आमच्याकडे तक्रार करा
नियमाप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयांना 17 नंबर फॉर्म स्वीकारणे बंधनकारक आहे. महाविद्यालयेच जर यात अडथळे आणत असतील तर ही गंभीर बाब आहे. कोणी फॉर्म स्वीकारत नसेल तर आमच्याकडे तक्रार करा. आम्ही कारवाई करू. पी. एस. पठारे, विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ