आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे होतो आम्ही...: अनेक मनाजोगी कामे करता आली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गजानन बारवाल, माजी महापौर, शिवसेना : एप्रिल १९९६ ते मे १९९७

पालिका आणि राज्यात नेहमीच वेगळ्या पक्षांची सत्ता राहिलेली आहे; परंतु राज्यात युतीची सत्ता असताना महापौरपद भूषवण्याची संधी गजानन बारवाल यांना मिळाली. सत्ताधारी पक्षाचा महापौर असल्यामुळे त्यांना अनेक कामे करता आली. रुग्णालयांचे बांधकाम, टाक्यांची दुरुस्ती, हायमास्ट आणि चौकांमध्ये वाहतूक बेटांची उभारणी करण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले. खुल्या संवर्गातील १८ नगरसेवकांना डावलून बारवाल यांना महापौरपद बहाल करण्याचा विश्वास बाळासाहेबांनी दाखवला. महापौर काळातील त्यांच्या आठवणी त्यांच्याच शब्दांत...
नगरसेवकपदाची माझी ही चौथी टर्म आहे. दोन वेळेस पदमपुऱ्यातून तर प्रत्येकी एकदा बन्सीलालनगर आणि क्रांती चौकातून निवडून आलो. सध्या बन्सीलालनगर वॉर्ड क्रमांक ७० चे प्रतिनिधित्व करत आहे. पहिल्यांदा १९८८ च्या निवडणुकीत मी पदमपुऱ्यातून निवडून गेलो होतो. १९९५ मध्ये क्रांती चौक वॉर्ड ओबीसी राखीव झाल्यामुळे मी येथून उभा राहिलो. सेना-भाजप स्वतंत्रपणे रिंगणात होती. एकूण ६००० मतांपैकी मला २३०० तर अपक्ष राजू बनसोड यांना १७०० मते मिळाली. भाजपचे किशोर महतोले तिसऱ्या क्रमांकावर होते. दुसरा वॉर्ड असतानाही मी ६०० मतांनी विजयी झालो होतो.

कामांचा धडाका : सत्ताधारी पक्षाचा महापौर असल्यामुळे प्रचंड वेगात कामे होत गेली. माझ्या काळात जेवढी कामे झाली, तेवढी इतर कोणत्याच महापौराच्या काळात झाली नसावी. शहराचा डीपी प्लॅन माझ्या कार्यकाळात मंजूर झाला. शहरात सहा नवीन आरोग्य केंद्रे उभी राहिली. सिद्धार्थ उद्यानात मत्स्यालय आणि पांढरे वाघ माझ्या काळात आले. तर आपल्याकडील वाघ संजय गांधी उद्यानात गेले. पालिकेच्या नवीन शाळांची बांधणी, जलकुंभांची दुरुस्ती आणि ४ नवीन जलकुंभांची उभारणी केली. सुदैवाने ६-७ महिने कृष्णा भोगे आयुक्त होते. त्यांनी शहराच्या सौंदर्यीकरणाचे मोठे काम हाती घेतले होते. माझ्या कार्यकाळात वाहतूक बेटे उभी राहिली. तर हायमास्ट बसवण्याचे कामही केले. रस्ते रुंदीकरणाचे काम मी सुरू केले. पण त्यात न्यायालयीन अडथळा आला. यामुळे हे काम रखडले. कामाचा आवाका पाहून पक्षाने मला १९९९ मध्ये विधानसभेची उमेदवारी दिली यात राजेंद्र दर्डां विजयी झाले अाणि माझा पराभव झाला.

१८ नगरसेवकांना डावलून महापौरपद
त्यावेळी महापौरपद हे खुले झाले होते. चंद्रकांत खैर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री होते. त्यांच्यासोबत मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेलो. मातोश्री बंगल्याचे काम सुरू असल्यामुळे बाळासाहेबांचा मुक्काम मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या खासगी बंगल्यात होता. तत्कालीन संपर्कप्रमुख दिवाकर रावते यांनी बाळासाहेबांकडे महापौरपदासाठी १८ जणांची यादी सादर केली. त्यात माझे नाव नव्हते. खैरे यांनी माझी इच्छा बाळासाहेबांसमोर मांडली. पण हे पद खुले असल्याने खुल्या उमेदवारालाच संधी मिळावी, असे काही जणांचे मत पडले होते. पण शिवसेना जात, धर्म मानत नाही. खुल्या जागेवर राखीवचा महापौर होण्यात काहीच हरकत नाही, असे सांगून बाळासाहेबांनी मला अाशीर्वाद दिला. मी शहराचा सातवा महापौर झालो.

(शब्दांकन : महेश जोशी)