आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे होतो आम्ही: प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन घेतले निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किशनचंद तनवाणी, माजी महापौर शिवसेना
एप्रिल २००५ ते नोव्हेंबर २००६

महापालिकेत कोणा एकाच्या इंटरेस्टच्या विषयांना येथे थारा नाही. वैयक्तिक स्वार्थ, फायदे येथे महत्त्वाचे नसून सर्वसामान्य नागरिक आणि त्याचे हित हेच केंद्रस्थानी ठेवून निर्णय घ्यावे लागतात, असे शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेेले माजी महापौर किशनचंद तनवाणी यांना वाटते. यामुळेच स्वत: व्यापारी असताना त्यांनी दिग्गज नेते आणि व्यापाऱ्यांचा कणखर विरोध डावलून जकातीचे खासगीकरण केले. यामुळे वर्षभरातच ४० कोटी रुपयांची भर पडू लागल्याने हा निर्णय योग्यच असल्याचे सिद्ध झाले. महापौर काळातील त्यांच्या आठवणी त्यांच्याच शब्दात...

मी हाडाचा शिवसैनिक होतो. पक्ष वाढीसाठी घाम गाळून काम केले. पक्षानेही भरभरून दिले. महत्त्वाची पदे मिळाली. माझ्या कामाची पावती म्हण्ूनच २००० च्या महानगरपालिका निवडणुकांत गुलमंडी वॉर्ड क्रमांक ३३ मधून पक्षाने उमेदवारी दिली. सहा महिन्यातच मी सभागृह नेता झालो. पहिल्याच टर्ममध्ये माझ्या कामाला सर्वत्र पसंती मिळत होती. यामुळे पक्षांतर्गत विरोधक तयार झाले. २००५ च्या निवडणुकीत माझे तिकीट कापण्यासाठी सर्वांनीच जोर लावला. पहिल्या यादीत माझे नाव नव्हते. यामुळे विरोधकांनी फटाके फोडून गुलमंडीवर जल्लोष केला. मी थेट मातोश्रीवर जाऊन शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांना माझे पक्षातील योगदान आणि पालिकेतील कामाची माहिती दिली. त्यांनी लगेच माझी उमेदवारी जाहीर केली. २००५ मध्ये दुसऱ्यांदा मी याच वॉर्डाचा नगरसेवक झालो.

मातोश्रीवरूनच महापौराचे नाव : निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी माझ्या नावाची घोषणा केली. युतीला निवडणुकीत दणदणीत यश मिळाले. तत्कालीन संपर्कप्रमुख विलास अवचट यांनी महापौरपदासाठी माझे नाव मातोश्रीवर सुचवले. त्यास उद्धव यांनी लगेच मंजुरी दिली. आणि शहराचा १५ वा महापौर म्हणून मी विराजमान झालो. सिडकोच्या हस्तांतरणाचा अध्यादेश २००१ मध्ये निघाला होता. हे काम २००६ मध्ये पूर्ण झाले. येथे हस्तांतरण झाल्यानंतरच मालमत्ता कर लावला जावा, यासाठी मी आग्रह धरला. याचा सिडको-हडकोतील १८ वॉर्डांतील ३ ते ४ लाख लोकसंख्येला फायदा झाला. गुंठेवारी भागातील करारनामे बाँडपेपरवर करण्यात यावे यासाठी मी मंत्रिमंडळ बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी यास परवानगी दिली. अनुकंपातत्त्वावरील २२५ कर्मचाऱ्यांना मी नियमित केले. तर वऱ्हाडकार प्रा.लक्ष्मण देशपांडे यांचे नाव गिनीज बुकमध्ये गेल्याबद्दल मी त्यांचा पालिकेच्या वतीने जाहीर सत्कार केला.

जकातीचे खासगीकरण
जकातीचे खासगीकरण करण्याच्या माझ्या निर्णयास व्यापाऱ्यांनी खूप विरोध केला. मी स्वत: व्यापारी असताना केवळ शहरासाठी हा कठोर निर्णय घेतला. पण याचे परिणामही दिसले. पालिकेचे उत्पन्न ६० कोटींवरून १०० कोटींवर गेले. कधी कधी असे निर्णय घ्यावेच लागतात.

खैरे, जैस्वालमुळेच बाहेर
महापौरपदावर असताना आणि इतर वेळेसही शहर हिताचे निर्णय घेत गेेलो. पण नंतर अतिरेक झाला. यामुळे शिवसेना सोडावी लागली. शहराचा विषय येतो तेव्हा आपण आपसातील मतभेद, राजकारण बाजूला ठेवायला हवे, असे मला वाटते. तरच सुंदर, हरित आणि निरोगी शहर तयार होऊ शकेल.

समांतरसाठी संघर्ष
शहराची तहान भागवणारी समांतर जलवाहिनी योजना मी आणली. त्यावेळी याचे बजेट ३६० काेटी रुपये होते. ती बीओटीवर करावी यासाठी खासदार चंद्रकांत खैर आग्रही होते. पण मला हे मान्य नव्हते. खैरेंनी ही योजनाच रद्द करण्यासाठी दबाव आणला. माझा राजीनामाही घेतला. पण मी ती रद्द न करता त्यात दुरुस्ती केली. अखेरीस शासनाच्या पैशातून ती राबवण्यात मला यश मिळाले.