आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे होतो आम्ही...: गुंठेवारीच्या वसाहतींत सेवा मिळवून दिली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुक्मिणी शिंदे,
माजी महापौर- शिवसेना.
फेब्रुवारी २००४ ते एप्रिल २००५

शहरातील मोठी लोकसंख्या गुंठेवारी भागात राहते. यातील अनेक भाग तर शहराच्या मध्यवस्तीचा भाग झाले आहेत; परंतु येथे पालिका सेवा देत नव्हती. पालिकेने येथेही सेवा द्यावी, यासाठी शासनाची खास मान्यता मिळवण्यात तत्कालीन महापौर रुक्मिणी शिंदे यांना यश मिळाले, तर क्रांती चौक उड्डाणपुलाची संकल्पनाही त्यांच्या काळातच मांडण्यात आली. त्या वेळच्या शहरातील सर्वात मोठ्या वॉर्डातून निवडून आलेल्या रुक्मिणीताईंच्या पालिकेतील तब्बल सव्वा वर्षाच्या आठवणी त्यांच्याच शब्दांत...
२००० मध्ये झालेल्या निवडणुकीत जयभवानीनगर या त्या वेळच्या वॉर्ड क्रमांक १४ मधून मी निवडून आले. एकूण ११ जण रिंगणात होते. शिवसेना-भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती, तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. भाजपच्या झिंजुर्डे, तर आघाडीच्या जाधव ताई यांच्याशी माझा सामना होता. वॉर्डाची लोकसंख्या सुमारे आठ हजार होती. ५२ टक्के मतदान झाले. मला २५०० मते पडली. दोन नंबरवरील झिंजुर्डे यांच्यापेक्षा मला १४०० मतांची लीड होती.
अडीच वर्षे महापौरपद महिला खुल्या वर्गासाठी राखीव झाले होते. यामुळे आम्ही मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांकडे यासाठी दावा केला; पण आधीच विमलताई राजपूत यांना हे पद जाहीर झाले होते. बाळासाहेबांनी शेवटचे सव्वा वर्ष मला पद देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार सव्वा वर्ष होताच मला मातोश्रीवर बोलावणे आले. याचा धक्काच बसला. माझ्या स्वप्नातील शहर घडव. तुला महत्त्वाची जबाबदारी देत आहे, असे सांगून त्यांनी मला महापौर पद सोपवले. हे सर्वच अकल्पित होते. बाळासाहेबांना दिलेला शब्द खरा करण्यासाठी झपाटल्यागत कामाला लागले. तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडेच नगरविकास खातेही होते. ते जेव्हा जेव्हा शहरात यायचे त्यांची भेट घेऊन शहराच्या विकासाचा प्रश्न उपस्थित करत गेले. त्यांचा पाठपुरावा करून रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांसाठी शंभर कोटी रुपये आणण्यात यश मिळाले. क्रांती चौक उड्डाणपुलाची संकल्पनाही त्या वेळीच मांडण्यात आली होती, तर समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पालाही चालना मिळाली; पण निधीअभावी त्या वेळी ही योजना आकार नाही घेऊ शकली. आता ही योजना पूर्णत्वास जाताना बघून आनंद होतो.
माझ्या कार्यकाळातील सर्वात मोठी बाब
गुंठेवारीतील जनता कर भरते; पण त्यांना सुविधा मिळत नव्हत्या. मी विलासरावांकडे येथे सुविधा देण्याकरिता पाठपुरावा केला. त्यास यश मिळाले. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा आला. शासनाने मनपाने गुंठेवारी भागातही सेवा द्यावी, असा आदेश काढला. माझ्या दृष्टीने ही माझ्या कार्यकाळातील सर्वात मोठी बाब होती. अजून खूप कामे करायची होती; परंतु सव्वा वर्षाचा काळ कमी पडला.
समाजकारण सुरूच
मधल्या काळात माझा वॉर्ड राखीव झाला. शिवाय याचे चार भागांत विभाजन झाले. दुसरीकडून उभे राहण्यात रस नव्हता. यामुळे राजकारणात सक्रिय नसले तरी समाजकारण सुरू होते. आता पुन्हा एकदा वॉर्ड खुला झाला आहे. पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास सज्ज आहे.