आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी होती मनपा: एक्स्प्रेस जलवाहिनीचे काम झाल्याचे समाधान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विकास जैन, माजी महापौर
सप्टेंबर २००१ ते ऑक्टोबर २००२

सलग चार वेळा नगरसेवक होण्याचा विक्रम मी प्रस्थापित केला. मात्र, मला त्याचे कौतुक नाही. या चार टर्मच्या कालावधीत मी बन्सीलालनगर वॉर्डाचा चेहरामोहरा बदलला. शिवाय महापौरपदाच्या कार्यकाळात एक्स्प्रेस जलवाहिनीचे काम झाले. सेव्हन हिल्सचा उड्डाणपूल उभारला गेला. इतरही अनेक कामे मार्गी लागली. त्याचा अधिक आनंद आहे, असे माजी महापौर विकास जैन यांनी सांगितले. प्रदीर्घ काळ महापालिकेच्या राजकारणात राहिलेले जैन यांचे अनुभव त्यांच्याच शब्दांत...
घरात राजकारणाचे वातावरण नसले, तरी शिवसेनेबाबत आकर्षण होते. १९९५, २०००, २००५, २०१० अशा सलग चार वेळेस निवडून जाण्याची संधी मिळाली. महापौर होता आले. १९९५ मध्ये बन्सीलालनगर वॉर्डातून अवघ्या २४ मतांनी निवडून आलो. पाच वर्षांत या वॉर्डाचा कायापालट केला. त्यास महाराष्ट्र शासनाचा आदर्श वॉर्डाचा पाच लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. २००० मध्ये वेदांतनगर वॉर्ड क्रमांक ३१ मधून उभा राहिलो आणि २४०० म्हणजे सर्वाधिक मतांनी निवडून आलो. तो एक विक्रम होता.
मी चंद्रकांत खैरे, प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी आणि संजय शिरसाठ यांच्याकडे महापौरपदाची इच्छा व्यक्त केली. त्यांनी यास होकार दिला. तत्कालीन संपर्कप्रमुख दिवंगत विलास अवचट यांनी ही इच्छा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापुढे ठेवली. त्यांनीही ती मान्य करत मला महापौर बनवले. बाळासाहेबांनीही नावाप्रमाणे शहराचा विकास करण्याचे सांगितले होते.त्याची प्रचिती म्हणून पुढील तीन टर्ममध्येही माझा वॉर्ड उत्कृष्ट वॉर्ड पुरस्काराचा मानकरी ठरला.
माझ्या काळातील काही निर्णय भविष्यासाठी ट्रेंडसेटर ठरले. २००५ मध्ये पालिकेचे बजेट अवघे ६०-६२ कोटींचे होते. त्या काळात कामाच्या हेडखाली बजेट अलोकेट केले जायचे. यामुळे अनुभवी नगरसेवक त्यांच्या वॉर्डात पैसा खेचायचे. मी नगरसेवकांच्या नावाने बजेट वितरित करणे सुरू केले. यामुळे प्रत्येकाला निश्चित निधी मिळू लागला. सेव्हन हिल्स, टाऊन हॉल उड्डाणपुलाचे काम झाले. रेल्वेस्टेशन ते दिल्ली गेट रोडचे काम झाले. नक्षत्रवाडी ते सिडको पाण्याच्या टाकीपर्यंतची ५ कोटी १० लाखांची एक्स्प्रेस जलवाहिनी माझ्या काळात आली. सिद्धार्थ उद्यानात मुलांची रेल्वे, टीव्ही सेंटर चौकात संभाजी महाराजांचा पुतळा, चार बॅडमिंटन कोर्टसह दहा दरवाजांसाठी प्रत्येकी दहा लाखांचा निधी दिला.
बीओटीचे जनक
बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या योजनेची ओळख मी शहराला करून दिली. याअंतर्गत महापौर बंगल्याजवळील शॉपिंग कॉम्प्लेक्सचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. वसंत भवन, शहागंज आणि औरंगपु-यातील भाजी मंडईचे कामही बीअोटीवर मंजूर झाले होते. आताच्या टर्ममध्ये मी स्थायी समिती सभापती झाल्यावर त्यास वेग दिला. पालिकेकडे पैसा नसल्यामुळे काम अडकवून न ठेवता ती पूर्णत्वास नेण्यासाठी हा उत्तम उपाय आहे.
मिटमिट्याची मागणी
यंदा वेदांतनगर, बन्सीलालनगर आरक्षित झाले आहेत. यामुळे जैन यांनी पक्षाकडे मिटमिटा या नवीन वॉर्डातून उमेदवारी मागितली आहे.