आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीचे बोलणे झाल्यावर आमची बोलणी- माजीमंत्री गंगाधर गाडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीत एमआयएमशी घरोबा केल्यानंतर माजी मंत्री गंगाधर गाडे यांनी आता काडीमोड घेण्याचीही भूमिका घेतली आहे. गाडेंनी आता शिवसेनेशी जवळीक साधली आहे. त्यांच्या पँथर्स रिपब्लिकन पक्षाने पालकमंत्री रामदास कदम यांच्याशी प्राथमिक बोलणी केली असून किमान २० जागा आम्हाला हव्यात, असे गाडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी गंगाधर गाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी मैत्री केली. त्यानंतर त्यांनी थेट काँग्रेसच्या व्यासपीठावर प्रवेश केला. मध्यंतरी ते भारतीय जनता पक्षात जाण्याच्या बेतात असल्याची बातमी बाहेर आली होती. मात्र, ऐनवेळी त्यांनी एमआयएम या नव्या पक्षाची मदत घेत पश्चिममधून विधानसभा निवडणूक लढवली. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. तेव्हाच नव्या पक्षाच्या मतदारांनी आपल्याकडे पाठ फिरवल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यामुळे ते या पक्षात जास्त दिवस राहणार नाहीत, हे स्पष्ट झाले होते. विधानसभेनंतर त्यांनी महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केली. पालकमंत्री कदम यांनी त्यांच्याशी दोन वेळा प्राथमिक बोलणी केली असून त्यांना सोबत घेतले जाईल, असे जाहीरपणे सांगितले. सध्या युतीच्या जागावाटपाचा तिढा आहे. तो मिटल्यानंतर शिवसेनेच्या कोट्यातून गाडे यांच्या पक्षाला काही जागा दिल्या जाऊ शकतात.
त्यामुळे गाडेही सध्या युतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याच्या प्रतीक्षेत आहेत. एकत्र लढण्याचे ठरल्यास गाडे यांच्या पक्षाचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. राजकारणात बदल होत असतात. तो माझ्या पक्षाला हवा आहे. म्हणून मनपा निवडणुकीसाठी मी शिवसेनेसोबत जाण्याचे ठरवले आहे. आम्ही जेथे लढू तेथे सेना पाठिंबा देईल, तर जेथे सेना लढेल, तेथे आमचा पाठिंबा असेल. युतीचे जागावाटप झाल्यानंतर आमची बोलणी होईल.