आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Minister Son Arrested In Case Of Land Scam

औरंगाबाद: पहाडसिंगपुरा भूखंड घोटाळा प्रकरणी माजी मंत्र्याच्या मुलावर गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मकबऱ्यामागील पहाडसिंगपुरा भूखंड घोटाळा प्रकरणी माजी राज्यमंत्री अब्दुल अजिम यांचा मुलगा अब्दुल सलीम यांच्यासह जमिनीचे मूळ मालक माधवराव सोनवणे, प्लॉट विक्रेता अब्दुल रऊफ अब्दुल रहीम, मनपाचे तत्कालीन इमारत निरीक्षक, अतिक्रमण हटाव पथकाचे अधिकारी, तलाठी व मंडळ निरीक्षक असा ७ जणांवर मंगळवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘दिव्य मराठी’ने ‘भूखंड विकणारे मोकाट’च या शीर्षकाचे वृत्त देऊन या घोटाळ्यावर प्रकाश टाकतानाच अब्दुल सलीम यांचाही घोटाळ्यात हात आहे असे वृत्त प्रसिद्ध केले होते. शताब्दीनगरातील शेख सलीम शेख सांडू यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

शेख सलीम यांनी १५ मार्च २०१० रोजी गट क्रमांक ९९/१ मध्ये ६०० चौरस मीटरचा प्लॉट ८० हजारांत विकत घेतला होता. मात्र खरेदी खतावर त्याची किंमत केवळ आठ हजार रुपये दाखवली होती. हा प्लॉट अब्दुल रऊफ याने विकला असून पैसे अब्दुल सलीम यांच्या नेहरू भवन येथील सोनिया महल येथे दिले असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. या भागातील सात एकर जमिनीचा मुखत्यारनामा १३ मार्च २००० रोजी झाला आहे, असे पठाण अमजद खान मोहंमद खान यांनी फिर्यादीस भासवले. त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने प्लॉटची खरेदी केली. ही जमीन ही ग्रीन झोनमध्ये असून तिचा न्यायालयात वाद सुरू आहे. शिवाय ही जमीन वसाहतीसाठी आरक्षित नाही. माधवराव सोनवणे यांनीदेखील पैशासाठी आरोपींना हवे तसे कागदपत्र तयार करून दिले म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी नगरसेवक राजू तनवाणी, राज आहुजा यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून ते अटकेत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी मधुकर सावंत, एस. आर. कौठाळे, सुभाष खंडागळे, हवालदार फरताळे, दत्तू गायकवाड, प्रकाश काळे, भागवत सुरवडे, मनोज उईके, महेश उगले, सचिन संपाळ तपास करत आहेत.