आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्डांच्या अलिप्ततावादामुळे खंदे समर्थक वा-यावर, उमेदवारी मिळेल की नाही, याचीही शाश्वती नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- तीन वेळा आमदार, दोन वेळा मंत्री राहिलेले राजेंद्र दर्डा सहा महिन्यांपूर्वी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून मोठ्या फरकाने पराभूत झाले. त्यानंतर ते राजकीय पटलावरूनही गायब झाले. याचा मोठा फटका त्यांचे समर्थक आजी-माजी नगरसेवकांना बसला आहे.
आता उमेदवारी मिळेल की नाही, दर्डा त्यांच्यासाठी शब्द टाकतील की नाही, याचीही या मंडळींना चिंता आहे. माजी विरोधी पक्षनेते मीर हिदायत अली, डॉ. जफर खान, असद पटेल, हबीब खान, मुजिबोद्दीन हे आजी-माजी नगरसेवक दर्डा यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. दर्डा सक्रिय असताना उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना कोणतेही प्रयत्न करावे लागले नव्हते; परंतु यंदाच्या निवडणुकीत उमेदवारीसाठी दर्डा शब्द टाकतील की नाही, असा प्रश्न या समर्थकांना पडला आहे.

१९९५ ची पुनरावृत्ती-
१९९५ मध्ये दर्डा हे तत्कालीन पश्चिम विधानसभा मतदारसंघातून प्रथम लढले होते. मात्र, चंद्रकांत खैरे यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर ते लगेच राजकारणापासून अलिप्त झाले होते. १९९९ च्या निवडणुकीत शिवसेनेने प्रदीप जैस्वाल यांच्याऐवजी गजानन बारवाल यांना उमेदवारी दिल्याने ते ऐनवेळी रिंगणात उतरले. जैस्वाल लढले असते, तर दर्डा लढणार नव्हते. त्यामुळे काँग्रेसने हा मतदारसंघ भारतीय बहुजन महासंघाला सोडला होता आणि त्यांचे अधिकृत उमेदवार म्हणून रामभाऊ पेरकर यांनी अर्जही भरला होता. नंतर त्यांनी माघार घेतली. त्यानंतर सलग तीन वेळा दर्डा हे विजयी होत राहिले. आमदार असतानाच ते सक्रिय राजकारणात राहिले. या वेळी पुन्हा पराभव पदरी पडताच ते पुन्हा राजकीय पटलावरून गायब झाले आहेत. ते २०१९ ला पुन्हा मैदानात येऊ शकतात, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.

समर्थकांना दुसरा धक्का
दर्डा हे राजकारणापासून काहीसे दूर झाल्याचे समर्थकांना आधीच समजले होते. मात्र, पक्षाने औरंगाबाद जिल्ह्यात पक्षवाढीच्या समितीतूनही दर्डांना बाजूला ठेवल्याने समर्थकांना हा मोठा धक्का होता. पालिका निवडणुकीची जबाबदारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र, पक्षाच्या जिल्हा कोअर कमिटीतूनही दर्डांना हद्दपार करण्यात आल्याने ही मंडळी अजूनही सैरभैर आहेत. दर्डांचे समर्थक असा शिक्का असल्यामुळे दुसरे नेते उमेदवारी देताना त्यांचा विचार करतील की नाही, अशीही भीती या मंडळींना आहे.

कॅनॉटमधील संपर्क कार्यालय बंदच
दर्डा यांनी कॅनॉट परिसरात सुरू केलेले त्यांचे संपर्क कार्यालय पराभवानंतर बंद आहे. गेल्या सहा महिन्यांत हे कार्यालय एकदाही उघडले नाही, असे शेजारी सांगतात. दर्डा मंत्री असताना ते सामान्यांना येथेच भेटत असत. सध्या ते कार्यालय कुलूप बंद आहे.