आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former MLAs Kishanchand Tanwani Give Free Water To 250 Homes

विहिरी दुरुस्त केल्यास शहर होईल टंचाईमुक्त!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एका जुन्या विहिरीच्या मदतीने माजी आमदार किशनचंद तनवाणी यांनी २५० घरांना मोफत वापराचे पाणी देण्याची योजना शनिवारी कार्यन्वित केली. अशाच प्रकारच्या शहरभर अडीचशेपेक्षा जास्त विहिरी आहेत. त्यातील १९७ विहिरींची नोंद तर पालिकेच्या दप्तरातही आहे. या विहिरी कार्यान्वित झाल्या तर वापरासाठी मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते.
एका अर्थाने शहर पाणीटंचाईमुक्त होऊ शकते. त्यामुळे पालिकेच्या पाणीपुरवठ्याची ओरडही आपोआपच कमी होईल. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापौर त्र्यंबक तुपे यांनी म्हटले आहे. आतापासून प्रयत्न सुरू झाले तर पुढील उन्हाळ्यात त्याचा फायदा होऊ शकतो.
समांतर जलवाहिनीद्वारे पाणी येण्यासाठी किमान तीन वर्षे लागतील, असा अंदाज आहे. पाण्याची वाढती गरज अन् तोकडी वाहिनी यामुळे चार ते पाच दिवसांनी शहरवासीयांना पाणी मिळते. पुन्हा पाणी कधी येईल याचा अंदाज नसल्याने नागरिक पाणी आले की साठा करून ठेवतात. मात्र, वापराचे पाणी दररोज मिळतेच, असे समजल्यानंतर नागरिक तसे करणार नाहीत. म्हणजेच पालिकेच्या पाण्याचा वापर कमी होऊ शकेल. ज्या वसाहतींमध्ये नळ नाहीत अशा ठिकाणीही पाणी देणे शक्य होईल.
२००८ मध्ये झाले होते प्रयत्न
शहराला पुरेसे पाणी मिळत नसल्याची ओरड झाल्याने पर्याय काय, असा प्रश्न समोर आला तेव्हा जुन्या विहिरींतून पाणी घेण्याचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी पुढे केला होता. सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले तेव्हा शहराच्या वेगवेगळ्या भागांत १९७ विहिरी असून त्यातील पाण्याचा वापर होऊ शकतो, असा अहवाल अभियंत्यांनी दिला होता. काही विहिरी गाळाने भरल्या आहेत. काहींमध्ये नागरिकच कचरा टाकतात, तर काही विहिरींचे पाणी नागरिक वापरत असल्याचे त्यात म्हटले होते. या विहिरी जर वापरात आणल्या तर अल्प खर्चात टंचाई निवारली जाऊ शकते, असे त्या वेळी स्पष्ट करण्यात आले होते. परंतु नंतर त्याकडे दुर्लक्ष झाले अन् तो प्रस्ताव तसाच धूळ खात पडून राहिला.
काय करावे लागेल?
या विहिरी साफ करून त्यातील पाणी वापरायोग्य आहे की नाही याची तपासणी. त्यानंतर डागडुजी, घरोघर नळ टाकणे शक्य झाले नाही तर किमान चौकाचौकात टाक्या उभारून तोट्या लावणे.
शहरभर विहिरी
जुने तसेच नवे शहर अशा सगळीकडेच जुन्या विहिरी तसेच बारव आहेत. भरउन्हाळ्यातही या विहिरींचे पाणी आटत नाही. राजाबाजार, समर्थनगर, वानखेडेनगर येथील विहिरी आटूच शकत नाहीत, असा छातीठोक दावा जुने नागरिक करतात. १९७२ च्या दुष्काळातही येथील विहिरीतील पाणी कमी झाले नव्हते, असेही सांगितले जाते.
पुनर्भरण करणार
- होय, विहिरींचे पाणी वापरले तर टंचाई काहीशी दूर होऊ शकते. पण सर्वच विहिरींचे पाणी वापरणे शक्य नसल्याची माहिती आहे. कोणत्या विहिरींचे पाणी वापरले जाऊ शकते, त्यासाठी काय करावे लागेल याची मी माहिती घेतो. काही विहिरींचे पुनर्भरणही करण्याचा विचार आहे. वापरासाठी हे पाणी नक्कीच उपयोगी ठरेल. येत्या काही दिवसांत त्यानुसार पावले उचलली जातील.
त्र्यंबक तुपे, महापौर.