आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fort Development Of Tourism, Minister Of Defense Is Green Signal

किल्ल्याच्या पर्यटन विकासाला संरक्षण मंत्र्यांकडून हिरवा कंदील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगरचा ऐतिहासिक भुईकोट किल्ला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याबाबतचा सामंजस्य करार येत्या दोन महिन्यांत करण्यात येईल, असे आश्वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गुरूवारी खासदार दिलीप गांधी यांना दिले.

पर्रिकर यांनी लष्कराच्या वाहन संशोधन विकास संस्थेला (व्हीआरडीई) गुरूवारी भेट दिली. यावेळी खासदार गांधी यांनी भुईकोट किल्ल्याचे छायाचित्र भेट देऊन त्यांचा सत्कार केला. किल्ल्याच्या पर्यटन विकासाबाबत अनुकूलता दर्शवत सामंजस्य कराराचा विषय तातडीने मार्गी लावू, असे अाश्वासन पर्रिकर यांनी यावेळी बोलताना दिले. खासदार गांधी याबाबत दिल्लीत सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भिंगारमधील चटई क्षेत्राचा प्रश्न सोडवण्याची मागणी करून भिंगारच्या विकासासाठी केंद्र राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे खासदार गांधी यांनी सांगितले. भिंगारमध्ये अद्ययावत मल्टीपर्पज शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याच्या मागणीचे निवेदनही त्यांनी दिले.

यावेळी व्हीआरडीईचे संचालक डॉ. मनमोहन सिंग, ब्रिगेडियर आकाश भानोत, संरक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी, तसेच नगरसेवक सुवेंद्र गांधी, संग्राम म्हस्के आदी उपस्थित होते.

स्वदेशी तंत्रज्ञान विकसित व्हावे
संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी व्हीआरडीईतील वेगवेगळ्या विभागांना भेट देऊन तेथे सुरू असलेल्या संशोेधनाची बारकाईने माहिती घेतली. संस्थेने लष्करासाठी विकसीत केलेली वाहने वाहन चाचणीचे ट्रक पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. लष्करी सिद्धता वाढवण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान विकसीत करून त्याचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले. पर्रिकर स्वत: आयआयटी अभियंते असल्याने त्यांनी व्हीआरडीईमधील संशोधकांशी तांत्रिक विषयावर सखोल चर्चा केली.

"दिव्य मराठी'ने लक्ष वेधले
नगरच्याकिल्ल्याच्या पर्यटन विकासाबाबत लष्करी अधिकारी अनुकूल आहेत. राज्य सरकारनेही जतन, संवर्धन विकासाचा आराखडा मंजूर केला आहे. केवळ संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकारदरम्यान सामंजस्य कराराचा तांत्रिक सोपस्कार झाला नसल्याने किल्ल्याचे काम रखडले आहे, याकडे "दिव्य मराठी'ने गुरूवारच्या अंकात लक्ष वेधले होते. खासदार गांधी यांनी हा अंक पर्रिकर यांना दिला. संबंधित वृत्त वाचून संरक्षण मंत्र्यांनी "हा प्रश्न मार्गी लागला म्हणून समजा' असे सांगितले.