आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Forth Coming Four Years For Railway Investment Suresh Prabhu

रेल्वेसाठी आगामी चार वर्षे गुंतवणुकीची : सुरेश प्रभू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रेल्वेत ४० वर्षांत गुंतवणूक न झाल्याने मोठी कोंडी झाली. देशाची जीवनवाहिनी जिवंत ठेवण्यासाठी आगामी चार वर्षे गुंतवणुकीवर भर देण्यात येणार असल्याचे सूतोवाच केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी आैरंगाबाद स्थानकाच्या नवीन इमारतीच्या शिलान्यास कार्यक्रमात बोलताना केले. पंधरा कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतीचा शिलान्यास रेल्वेमंत्री प्रभू यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खासदार चंद्रकांत खैरे, राजकुमार धूत, आमदार संजय शिरसाट, इम्तियाज जलील, विक्रम काळे, सुभाष झांबड, महापौर त्र्यंबक तुपे, दक्षिण मध्य रेल्वेचे व्यवस्थापक प्रदीप सक्सेना, नांदेडचे विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांची उपस्थिती होती.

प्रभू म्हणाले, आगामी काळात कठोर निर्णय घेतले जातील. परंतु प्रवाशांवर कुठलाही बोजा टाकला जाणार नाही. अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे पहिल्या ३६ दिवसांत ३९ घोषणांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

आैरंगाबादला १५ कोटींचे स्थानक : रेल्वेस्थानकावरील नवीन इमारतीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचा शिलान्यास केला असून पंधरा कोटी रुपये खर्चून अद्ययावत स्थानक निर्माण केले जाईल. मराठवाड्यास यापूर्वी मोठा निधी मिळाला नाही तेवढा आताच्या सरकारने अर्थसंकल्पात मंजूर केला आहे. राज्यातील रेल्वेचे प्रकल्प राज्य शासनाच्या मदतीने मार्गी लावले जातील. यासाठी राज्याइतकाच निधी केंद्राच्या माध्यमातून दिला जाईल. त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचे भागभांडवल राज्य उभारणार अाहे. निधीचा लेखाजोखा असा: मुदखेड ते परभणी ८८ किमी रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी शंभर कोटी रुपये मंजूर केले. परभणी ते मनमाड या २८१ किमी मार्गाच्या दुहेरीकरणासंबंधी लवकरच मंजुरी प्रदान केली जाणार आहे. अकोला-खांडवा मार्गाच्या गेज कन्व्हर्जनच्या कामासाठी दोन हजार कोटींची मान्यता घेतली जाईल. मुदखेड व दौलताबाद येथे दोन रेल्वे उड्डाणपुलांसाठी ८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. परळी-बीड-नगर या २६२ किमी मार्गासाठी १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जालना येथील ड्रायपोर्टसाठी मुंबईपर्यंत स्वतंत्र रेल्वेलाइन टाकण्याची मागणी केली. शेंद्रा आैद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र लाइन टाकणे, मुंबईला जाण्यासाठी स्वतंत्र रेल्वे सुरू करून इतर गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याची मागणी केली. आैरंगाबाद रस्ता रुंदीकरणात रेल्वेच्या गेस्टहाऊसमागील जागा रेल्वेने द्यावी, अशी मागणी बागडे यांनी केली. खासदार खैरे यांनी सोलापूर-जळगाव रेल्वेमार्ग आैरंगाबादमार्गे व्हावा तसेच रेल्वेस्टेशन आैद्योगिक वसाहतीमध्ये उड्डाणपूल करणे व कन्नड घाटात राष्ट्रीय महामार्गाला समांतर रेल्वेमार्ग करण्याची मागणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक सक्सेना यांनी केले, तर आभार नांदेडचे विभागीय व्यवस्थापक शर्मा यांनी मानले.

वेळे अभावी आयोजकांची धांदल : अत्यंत कमी वेळेत कार्यक्रम आटोपून रेल्वेमंत्री प्रभूंना दिल्लीला जायचे असल्याने आयोजकांची चांगलीच धांदल उडाली. आमदार शिरसाट यांनी काडेपेटीने मेणबत्ती पेटवली. त्यानंतर दीपप्रज्वलन केले गेले. कार्यक्रमापूर्वी ईशस्तवन म्हणण्यासाठी स्थानिक गायिकेला आमंत्रित केले होते; परंतु ईशस्तवनाचे गायनच करण्यात आले नाही. कार्यक्रम संपताच घाईघाईने राष्ट्रगीत म्हणण्यात आले.
अॉटो क्लस्टरच्या उद््घाटनप्रसंगी मनोहर पर्रीकर, सुरेश प्रभू, खा. खैरे आदी. छाया : रवी खंडाळकर