आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी विश्‍व : सावंगीत एकाच रात्रीत चार घरफोड्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सावंगी (हर्सूल) गावात चोरट्यांनी एकाच रात्री चार घरफोड्या केल्या. घरात कोणीच नसल्याची संधी साधून चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्री हा डाव साधला. फुलंब्री पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सावंगी बसस्थानक परिसरातील औरंगाबाद-अजिंठा महार्गावरील श्रीकृष्ण तेलभंडार दुकानास चोरट्यांनी लक्ष्य केले. रोख रकमेसह काजू अडीच आणि बदाम अडीच किलोसह शेंगदाण्याची गोणीही लांबवली. सोमीनाथ म्हस्के यांचे हे दुकान आहे. त्यानंतर चोरट्यांनी बाजूलाच असलेल्या हार्डवेअरच्या दुकानावर मोर्चा वळवला. रंगनाथ पवार यांचे दुकान त्यांनी फोडले. त्यानंतर चोरट्यांनी विठ्ठल रुखमाई मंदिर परिसरातील प्रदीप रावसाहेब जगदाळे यांच्या घरातील रोख 30 हजार आणि 55 हजारांचे दागिने असा एकूण सुमारे 85 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. सय्यद अफसर यांचे घरही चोरट्यांनी फोडले. ते बाहेरगावी गेल्यामुळे चोरट्यांनी काय लांबवले, याची माहिती मिळू शकली नाही.
गस्तीची मागणी
एकाच रात्री चार घरफोड्या होण्याची ही बहुदा पहिलीच वेळ आहे. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. फुलंब्री पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास या भागात गस्त घालावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
घरांना कडी लावली
प्रदीप जगदाळे यांच्या घरी चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी शेजारीच राहणा-या नारायण जगदाळे, श्रीधर जगदाळे, प्रभू जगदाळे यांच्या घराला बाहेरून कडी लावली. यामुळे एकच गोंधळ उडाला होता. पोलिस पाटील दादासाहेब जगदाळे यांनी ही माहिती फुलंब्री पोलिसांना दिली.