आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठ्यात कंटेनर-ट्रेलरच्या धडकेनंतर आग, चार ठार; दोन तास वाहतूक ठप्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा - औरंगाबाद- जळगाव महमार्गावरील अजिंठा गावाजवळ कंटेनर ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. अपघातात एक ठार झाला, तर अपघातानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतल्याने आगीत तीन जण असे एकूण चार जण ठार झाले. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना अजिंठा गावाजवळ एक किलोमीटरवर असलेल्या रेणुका पेट्रोल पंपाजवळ गुरुवारी सकाळी सहा वाजता घडली. आग एवढी भीषण होती की ट्रकसोबत तीन जणांचा कोळसा झाला.

अपघातात कंटेनरमधील शेख शोएब शेख अब्बास (रा. नायगाव, जि. औरंगाबाद), सोनू ऊर्फ संदीप देविदास गायकवाड (ह.मु. सावंगी, औरंगाबाद, रा. मेहकर, जि. बुलडाणा), कुलदीप सुरेश कांबळे (रा. मेहकर, जि. बुलडाणा), ट्रेलरमधील चालक रघू असे चौघे ठार झाले. तर ट्रेलरमधील एम. पी. राव, दसरी व्यंकटेश परराव (रा. बंगळुरू, कर्नाटक) हे दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर औरंगाबाद येथील घाटीत उपचार सुरू आहेत. गुरुवारी सकाळी सहा वाजता जळगावहून औरंगाबादकडे सिमेंट घेऊन जाणारा कंटेनर (एमएच २६ एच ७५६५) औरंगाबादहून जळगावच्या दिशेने जाणारा ट्रेलर (एपी १६- ५६७५) यांच्यात समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर दोन्ही गाड्यांनी पेट घेतला होता.

अखेरची सहरी
सध्या रमजानचा महिना सुरू आहे. त्यातच कंटेनर चालक शोएब शेख अब्बास यांनी पहाटे चार वाजता कंटेनर थांबवून उपवासासाठी सहरची नमाज अदा केली होती. काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने परिसरात या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातातील ट्रकने असा पेट घेतला. अपघातानंतर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
बातम्या आणखी आहेत...