आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार खंडणीबहाद्दर पोलिसांची उचलबांगडी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद: वाहनांमध्ये स्वयंपाकाचा गॅस भरणार्‍या अड्डय़ावर छापा मारल्यानंतर 1 लाखाची खंडणी मागणार्‍या चार पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी दिले आहेत. संबंधित पोलिस निरीक्षकाच्या अभयामुळे दुसर्‍यांदा असा प्रकार घडला आहे. यापूर्वी वाळूज आणि एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यातील चार पोलिसांची आयुक्तांनी मुख्यालयात तडकाफडकी बदली केली आहे.
विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, मोंढा भागात रफिक याचे वाहनात गॅस भरून देण्याचे केंद्र आहे. येथे अनधिकृतपणे स्वयंपाकाचा गॅस वाहनांमध्ये इंधन म्हणून भरून दिला जात होता. दोन दिवसांपूर्वी क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील जमादार नितीन जाधव, शिपाई समद पठाण, सुनील जाधव आणि सतीश साळवे यांनी तेथे छापा मारला. रफिकने सोडून देण्यासाठी गयावया केल्यानंतर पोलिसांनी त्याला यासाठी 1 लाख रुपये मागितले. याच कारणावरून रफिक आणि पोलिसांत वाद झाला. तडजोडीअंती पोलिसांनी 25 हजारांची खंडणी रफिककडून घेतली. मात्र दुखावलेल्या रफिकने थेट पोलिस आयुक्त संजयकुमार यांच्याकडे या खंडणीबाबत तक्रार केली. यापूर्वीही हॉटेल चालक आणि नोकराच्या पैशाच्या वादातून आर्थिक तडजोड केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला होता. या प्रकरणावरून पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी वाळूज आणि एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यातील चार पोलिसांची तडकाफडकी बदली केली होती. साहाय्यक पोलिस आयुक्त नरेश मेघराजानी यांनी चारही पोलिसांची चौकशी केली असून, चौकशी अहवाल शुक्रवारी सायंकाळी पोलिस आयुक्तांना सादर केला. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आयुक्तांनी चारही कर्मचार्‍यांना आयुक्तालयात बोलावले होते. या चौघांचीही पोलिस आयुक्तांनी चांगलीच कानउघाडणी केली.