आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंकट: चार तालुक्यांची मदार टँकरच्या पाण्यावरच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात धरणांतील साठ्यांत सातत्याने घट होत असून त्यामुळे ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात टंचाईचा प्रश्न गंभीर असून जिल्ह्यात २५४ टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. पैठण, गंगापूर, वैजापूर आणि औरंगाबाद या चार तालुक्यांत जलसंकट भीषण असून एकट्या पैठण तालुक्यात ६२ गावांना ९३ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. औरंगाबाद २३, गंगापूर ७७, वैजापूर ५६, तर खुलताबाद तालुक्यातील तीन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. उन्हाळा सुरू होईपर्यंत ही संख्या आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

मोठ्या प्रकल्पांत ०९ % पाणी
मराठवाड्यातीलसर्व ८४१ प्रकल्पांत ६५५ दलघमी (०८ %) उपयुक्त पाणीसाठा आहे. जायकवाडी धरणात १२३ दलघमी (०६ %) तर परभणीमध्ये ५० दलघमी (०५ %) उपयुक्त साठा आहे. सिद्धेश्वर धरणात एक टक्क, उर्ध्व पैनगंगा २० टक्के, विष्णुपुरीत २५ आणि निम्न दुधनामध्ये ३२ टक्के साठा आहे. माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, मानार आणि सिनाकोळेगाव या धरणांत टिपूसही नाही.

डिसेंबरनंतर पाणी पातळीत सातत्याने घट
मराठवाड्यातील एकूण जलसाठा अवघा आठ, तर लघु प्रकल्पांत फक्त पाच टक्के साठा आहे. उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच मराठवाड्याची तहान टँकरने भागवली जात आहे. डिसेंबरनंतर पाणी पातळीत सातत्याने घट होत असून त्या प्रमाणात टँकरच्या संख्येतही वाढ होत आहे.