आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवड्यात दुसऱ्यांदा, तर चार वर्षांत १४० वेळा बंद पडले रेल्वेचे इंजिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - इंजिन बंद पडल्याने तपोवन एक्सप्रेस तीन तास खोळंबल्याचा प्रकार आठ दिवसांपूर्वी घडला होता. हा प्रकार ताजा असतानाच शनिवारी पुन्हा नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेस चे इंजिन सातोना स्थानकाजवळ बंद पडले. त्यामुळे ही गाडी तब्ब्ल अडिच तास उशीरा जालना स्थानकावर पोहचली. दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने नांदेड विभागास सातत्याने जुने इंजिन दिले जात असल्याने इंजिन बंद पडून रेल्वे खोळंबण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या चार वर्षात या मार्गावर तब्बल १४० वेळा रेल्वे इंजिन बंद पडण्याचे प्रकार घडले आहेत.
नरसापूर-नगरसोल एक्सप्रेस ही रेल्वे पहाटे पाच वाजता परभणी स्थानकावरुन निघाली. त्यानंतर सकाळी ६.१५ वाजता सातोना येथे या रेल्वेचे इंजिन बंद पडले. त्यामुळे ही रेल्वे सातोना स्थानकावरच खोळंबली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी याची माहिती नांदेड विभागीय कार्यालयास तसेच जालना येथे कळविली.दरम्यान कोडी स्थानकावर मालगाडी उभी होती. त्या मालगाडीचे इंजिन नरसापूर -नगरसोल एक्सप्रेस ला बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यात मोठा वेळ गेल्याने प्रवाशांना सातोना येथेच थांबून रहावे लागले. याचवेळी परभणीकडून येणारी मराठवाडा एक्सप्रेस सातोना स्थानकावर थांबविण्यात आली. या रेल्वेतून काही प्रवाशांनी पुढचा प्रवास केला. आठ वाजेच्या सुमारास कोडी येथून मालगाडीचे इंजिन सातोना येथे आणण्यात आले त्यानंतर ही गाडी पुढे रवाना करण्यात आली. नरसापूर एक्सप्रेस सकाळी वाजता जालना स्थानकावर येते शनिवारी ती ९.३० वाजता पोहचली. सातोना स्थानकारच ही गाडी बंद पडल्याने इतर गाड्यांवर त्याचा परिणाम झाला नाही. परंतू प्रवाशांना जवळपास अडिच तास खोळंबून रहावे लागले. डिसेंबर रोजीच इंजिन मधून डिझेल गळती झाल्याने तपोवन एक्सप्रेस कोडी स्थानकावर तीन तास खोळंबली होती. आठवडाभराच्या आतच दुसऱ्यांदा रेल्वेचे इंजिन बंद पडल्याने या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

पॉवरकट मुळे इंजिन फेल
नरसापूर-नगरसोलइंजिनची पॉवर कट झाल्यामुळे इंजिन फेल झाल्याचे रेल्वेतील अधिकाऱ्याने सांगीतले. इंजिनला विज पुरवठा करणारे वायर तुटल्यामळे हा प्रकार घडू शकतो असे या अधिकाऱ्याने नाव सांगण्याच्या अटीवर सांगीतले. गेल्या आठवड्यात तपोवन एक्सप्रेस च्या इंजिनला इंधन पुरवठा करणाऱ्या पाईपला गळती लागल्याने रेल्वे थांबवावी लागली होती.
नेहमीचेरडगाणे थांबवा : इंजिनबंद पडण्याचे प्रकार सातत्याने होत आहेत. सुरक्षित प्रवासासाठी रेल्वे प्रवासाची निवड केली जाते मात्र नांदेड विभागातच असे प्रकार घडत असल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. सातत्याने असे प्रकार घडल्यास प्रवाशांचा उद्रेक होऊ शकतो असे एका प्रवाशाने सांगीतले. नांदेड-औरंगाबाद मार्गावर नियमीत अपडाऊन करणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांची संख्या अधिक आहे.

जुन्या इंजिनला मर्यादा
जुन्या इंजिनवर १३ डब्यांच्या रेल्वे चालु शकतात. शिवाय या इंजिनला वेग आणि अंतराचीही मर्यादा येते. सध्या रेल्वेचे अंतर आणि वेगाचीही मर्यादा वाढली आहे शिवाय रेल्वेचे डबेही वाढल आहेत. अशा परिस्थितीत जुन्या इंजिनला मर्यादा येत असल्याने नवे इंजिन दिले जावे सातत्याने होणारे हे प्रकार थांबवावेत अशी मागणी केली जात आहे.

आंध्र प्रदेशाचीच चलती
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय सिकंदराबाद येथे असुन यात सिकंदराबाद,हैदराबाद,विजयवाडा,गूंतकल,गुंटूर आणि नांदेड या सहा विभागांचा समावेश आहे. नांदेड विभागाचा २० टक्के भाग आंध्र प्रदेशात म्हणजे तेलगू भाषिक पट्ट्यात मोडतो. उर्वरित भाग वाशिम,अकोला मराठवाड्याचा आहे. या झोनवर सुरुवातीपासूनच प्रशासकीय राजकीय दृष्ट्या आंध्र प्रदेशाची चलती राहीलेली आहे. त्यामुळे नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.
लोकोशेड नसल्याने समस्या
नांदेड विभागातून दररोज ८० ते ८२ रेल्वे सुटतात. येथे रेल्वेचे इंजिन देखभाल दुरुस्ती केंद्र (लाेकोशेड ) नाही. त्यामुळे इतर विभागांकडून रेल्वे इंजिन घ्यावे लागते. तर १५० किंवा त्यापेक्षा जास्त रेल्वे सुटणाऱ्या विभागांनाच स्वत:चे लोकोशेड दिले जाते. त्यासाठी त्या विभागाचे उत्पन्न तो विभाग सक्षम आहे का हे सुध्दा बघितले जाते. त्यामुळेही नांदेड विभागात इंजिन फेल हाेण्याचे प्रकार वाढत आहेत.
१४० वेळ फेल झाले इंजिन
नांदेड विभागात चार वर्षात जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत १४० वेळा रेल्वे इंजिन बंद पडण्याचे प्रकार घडले. दक्षिण मध्य रेल्वेला २००२ ते २०१४ या कालावधीत १४ नवे रेल्वे इंजिन मिळाले. हे सर्व इंजिन नांदेड व्यतिरिक्त इतर विभागांना दिले. इतर विभागांचे जुने इंजिन नांदेड विभागाला देण्यात येतात. त्यामुळेच या मार्गावर सातत्याने रेल्वे इंजिन फेल होण्याचे प्रकार वाढत आहेत.
बातम्या आणखी आहेत...