आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकी अन् दुचाकी प्रतिष्ठा नसून गरज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जगभरातील वाहतूक आणि त्यामुळे उद््भवणाऱ्या समस्यांवर अभ्यास करणारे अशोक दातार यांनी शहरातील वाहतूक समस्येवर तीन उपाय सुचवले आहेत. वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी सर्वप्रथम नागरिकांनी आपल्या मानसिकतेत बदल करावा, चारचाकी किंवा दुचाकी हे प्रतिष्ठेचा विषय नसून ती गरज समजून या वाहनांचा योग्य वेळी वापर करणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे आदी प्रमुख उपायांबरोबरच इतरही अनेक उपाय त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सुचवले.

दातार यांच्या मते, औरंगाबादसारख्या लहान शहरात वाहतुकीचे योग्य नियोजन करणे शक्य आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणेवर आधारित राहता नागरिकांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. कामावर जाण्यासाठी अनेक लोक दुचाकी किंवा चारचाकी वापरतात. मार्केटिंग आणि फिरतीची कामे करणाऱ्यांना गाडीशिवाय पर्याय नसतो.मात्र ज्यांना नियोजित वेळेत कार्यालयात जायचे आहे आणि ठरलेल्या वेळेत परत यायचे आहे त्यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच वापर करावा. ज्यांचे कार्यालय घरापासून दीड किलोमीटरवर आहे त्यांनी चालत जावे. ज्यांचे कार्यालय पाच किलोमीटरवर आहे त्यांनी सायकल वापरावी आणि पाच किलोमीटरपेक्षा अधिक अंतरासाठी बस, रेल्वेचा वापर करावा. यामुळे पार्किंगची समस्या सुटेल, सिग्नलवर होणारी वाहतुकीची कोंडीही फुटेल.

कोण आहेत दातार?
गरवारे,रिलायन्स अशा नामांकित कंपनीत दातार यांनी व्हाइस प्रेसिडंट पदापर्यंत काम केले आहे. याशिवाय मुंबईतील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी न्यायालयाने आणि एमएमआरडीएने स्थापन केलेल्या समितीवर ते सल्लागार आहेत. १५ वर्षांपासून देशातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी काय उपायोजना करता येतील यावर ते अभ्यास करीत आहेत.

१.५ किलोमीटर - चालत जा
१.५ ते किलाेमीटर - सायकलचा वापर करा

पेक्षा पुढे - बस, रेल्वे किंवा कुठल्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा.

आणखी काही उपाय
{शहरातील पार्किंगमध्येच गाडी लावावी. पार्किंग शुल्क किमान एक लिटर पेट्रोलच्या किमतीएवढे असावे. किमान एका व्यक्तीसाठी जी गाडी रस्त्यावर धावते ती सवयच बंद होईल.
{आपल्या गाडीमुळे प्रदूषण होते. त्यामुळे कोणाच्या तरी आरोग्यावर परिणाम होतो आहे याचे सामाजिक भान ठेवावे.
{उड्डाणपुलांखालून गाड्या जाण्यास जागा असावी. या जागेचाही वापर करावा.
{शहरातील रस्ते अरुंद असल्यास वाहनांची गती कमी राहते. शहरात २० किलोमीटर प्रतितास या वेगाने गाडी चालवावी.
{शहरातील प्रत्येक रस्त्यावर फुटपाथ आणि सायकलसाठी स्वतंत्र रस्ता आणि सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसेससाठी स्वतंत्र रस्ता असावा.