आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Wheeler Vehicle Thief Caught By Criminal Branch Police

चारचाकी वाहनचोरांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केले जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वाहन चोरण्यात पटाईत असलेल्या राजेश पाटील याच्या टोळीतील अट्टल चारचाकी वाहनचोर अली खान ऊर्फ इम्रान दिलशाद खान (26, रा. निझामगड, उत्तर प्रदेश) याला दोन साथीदारांसह गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता अटक केली. उत्तर प्रदेशातील बनावट किल्ल्यांच्या आधारे शहरातील महागड्या गाड्या चोरण्यात येत होत्या. त्यांच्याकडून इनोव्हा व झेन कार जप्त करण्यात आल्या. न्यायालयाने तिघांना 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सिडकोतील व्यंकटेश सोसायटीतील व्यापारी कृष्णा काळे यांची 22 जून 2013 रोजी मध्यरात्री घरासमोरील टाटा सफारी कार (एमएच-20 बीएन-8557) चोरट्यांनी पळवली होती. या गुन्ह्याचा तपास करताना अली खान महिनाभरापूर्वी शहरात आला असल्याचे गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याचे साथीदार संदीप ज्ञानदेव गुंजाळ (26, रा. दुसरबीड, ह.मु. चितेगाव), मोहंमद आफताब खान मोहंमद शरीफ खान (20, रा. बाबंकी, ह.मु. बुढीलेन) या दोघांना पकडले. त्यांनी पुणे येथून चोरलेली इनोव्हा, मारुती झेन (एमएच-05-एच-9340) जप्त केली. त्याचप्रमाणे बनावट क्रमांकांच्या 16 नंबर प्लेट आणि 16 बनावट चाव्या जप्त केल्या. या तिघांनी कृष्णा काळे यांची टाटा सफारी पळवल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. वाहन चोरण्यासाठी अली खान हा उत्तर प्रदेशातून बनावट चाव्या बनवून आणायचा. त्याने इंदूर, सुरत आणि औरंगाबाद येथून बर्‍याच महागड्या कार चोरून नेल्याची कबुलीही दिली आहे.

अली खान आणि अटकेत असलेला शेख दाऊद ऊर्फ बब्बू शेख मंजूर हे एकाच टोळीत काम करत आहेत. शेख दाऊद याने आफताब खान आणि संदीप गुंजाळ यांची अली खानशी ओळख करून दिली होती. राजस्थानातील चोरांच्या मागणीनुसार अली खान महागडी वाहने चोरण्यासाठी झेन कारमध्ये बसून फिरायचा. त्या चोरांच्या मागणीनुसार कार शोधून ती शहराबाहेर नेली जायची. यानंतर राजस्थानातील वाहनचोरांच्या एजंटच्या साहाय्याने एक लाख 20 हजारांत कारची विक्री व्हायची. अली खान आणि आफताब खान हे दोघेही कार मेकॅनिक आहेत. अली खान हा दहावी, आफताब खान नववी पास आहे, तर संदीप हा बारावी नापास आहे.