आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - चारचाकी गाड्यांच्या काचांवर लावलेल्या काळ्या फिल्म काढण्याच्या पोलिसांच्या कारवाईने जोर धरल्यानंतर शहरातील व्हीआयपींनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलिसांनी हजारावर गाड्यांच्या काळ्या काचा काढल्या. कारवाईदरम्यान अनेकांनी पोलिसांशी हुज्जतही घातली. मात्र, सगळ्यांसाठी सारखेच नियम असल्याचे पोलिसांनी दाखवून दिले. गेल्या तीन महिन्यांत पोलिसांनी चार हजार गाड्यांवर कारवाई केली आहे.
मे 2012 मधील पहिला निर्णय : उच्च न्यायालयाकडून यासंदर्भात मे 2012 मध्ये आदेश देण्यात आला होता. त्यानुसार गाडीला पूर्णपणे काळ्या काचा चालणार नाहीत, असे म्हटले होते. आरटीओकडून मान्य करण्यात आलेल्या मागच्या काचांसाठी 70 टक्के आणि बाजूच्या काचांसाठी 50 टक्के पारदर्शकतेला यानुसार मान्यता होती. या निर्णयानंतर अनेकांनी गाडीची फिल्म या प्रमाणानुसार बदलून घेतली. दरम्यान, फिल्म बनवणार्या एका कंपनीने उच्च न्यायालयात याविषयी याचिका दाखल केली असता, ऑगस्ट 2012 मध्ये न्यायालयाने सुधारित निर्णय दिला.
आयुक्तांनी गाडीवरील फिल्म काढून केली मोहिमेला सुरुवात : देशभरात ही मोहीम सुरू असताना औरंगाबादेत मात्र आमदार, खासदार, नगरसेवक, नेते आणि अधिकारी हे स्वत:च्या गाडीला काळ्या काचा लावून मिरवत होते. मार्च महिन्यात दै. ‘दिव्य मराठी’ने ही बाब समोर आणत अधिकार्यांना आणि लोकप्रतिनिधींना गाडीच्या काळ्या काचा काढण्यास भाग पाडले होते. स्वत: पोलिस आयुक्तांनी आपल्या गाडीवरील फिल्म काढून या मोहिमेस सुरुवात केली होती. या तीन महिन्यांत पोलिसांनी सुमारे 4 हजार गाड्यांवरील काळी फिल्म काढली. मोटार वाहन अँक्टमधील कलम 100/ 2 नुसार अशा गाड्यांना 100 रुपये दंड आणि जागेवर फिल्म काढण्याचा नियम आहे. अशीच कारवाई चारचाकी वाहन, बस आणि ट्रॅव्हल्सवरदेखील व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे.
अशा प्रकारच्या टिंटेड काचा चालतील :
उच्च न्यायालयाच्या नियमानुसार गाडीच्या काचांवर कुठल्याच प्रकारची फिल्म चालणार नाही. मात्र, टिंटेड ग्लास चालतील. हा काचेचा प्रकार सन गॉगलसारखा असतो. उन्हात गेल्यानंतर या गाड्यांच्या काचा काळ्या होतात आणि सावलीत त्या पुन्हा पारदर्शक होतात. यासाठीदेखील पारदर्शकतेचे प्रमाण उच्च न्यायालयाकडून ठरवण्यात आले आहे.
गाडीच्या मागील बाजूची काच ही 70 टक्के, तर बाजूच्या काचा 50 टक्के पारदर्शक असणे आवश्यक आहे. नव्याने येणार्या गाड्यांच्या नवीन मॉडेलमध्ये अशा प्रकारच्या काचा कंपनीकडून बसवण्यात आल्या आहेत.
आम्ही काय करावे?
प्रथम न्यायालयाने 50 टक्के आणि 70 टक्के गडद काचा चालतील, असे आदेश दिले होते. मात्र, काही दिवसांतच गाड्यांच्या काचांवर फिल्म चालणार नाही, असे आदेश देण्यात आले. एका महिन्यात बदललेल्या नियमांमुळे वाहनधारक संभ्रमात पडले आहेत. जर 50 टक्क्यांची टिंटेड ग्लास चालत असेल तर काळ्या फिल्म का चालत नाहीत, असा प्रश्न वाहनधारक पोलिसांना विचारत आहेत.
ऑगस्ट 2012 चा निर्णय
या याचिकेवर निर्णय देत कोणत्याच प्रकारची फिल्म गाडीच्या काचांना लावू नये, असे आदेश न्यायालयाने दिले. या निर्णयानुसार गाडीची काच ही पूर्णपणे पारदर्शक असावी, काचेवर काहीही लावू नये, असे या आदेशात सांगण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिस महासंचालक आणि पोलिस आयुक्तांना दिले आहेत. ही मोहीम देशभरात सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त अजित बोर्हाडे यांनी दिली.
कुठलीच फिल्म चालणार नाही
उच्च् न्यायालयाच्या आदेशानुसार गाडीवर कुठल्याच प्रकारची फिल्म चालणार नाही. ऑगस्ट 2012 मध्ये आलेल्या आदेशानुसार टिंटेड ग्लास चालतील, मात्र फिल्म चालणार नाही. यातला फरक अनेक वाहनधारकांना कळत नसल्यामूळे गैरसमज होतात. अजित बोर्हाडे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.