आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौदा वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून, रेल्वेस्टेशन मागील झुडपात सापडला मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - कुटुंबीयांसोबत जेवण करून मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या चौदा वर्षीय युवकाचा दगडाने ठेचून निर्घृन खून करण्यात आला. रेल्वेस्टेशन मालधक्का परिसरातील झुडपात त्याचा मृतदेह सापडला. मंगळवारी सकाळी ट्रकचालक तसेच परिसरातील लोकांना मृतदेह आढळल्याने हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. नशा करणाऱ्या मुलांनी त्याचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. रात्री उशिरापर्यंत लोहमार्ग पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरू होती. युसूफ जोसेफ कांबळे (१४, रा. राजीव गांधी नगर, स्टेशन परिसर) असे मृताचे नाव आहे. 

युसूफ कांबळे हा भंगार वेचण्याचे काम करतो. सोमवारी रात्री घरी जेवण केल्यानंतर मित्राकडे जातो असे कुटुंबीयांना सांगून तो घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही म्हणून मध्यरात्रीनंतर घरच्यांनी शोधकार्य सुरू केले. मात्र तो सकाळपर्यंत सापडला नाही. दरम्यान, रेल्वेस्टेशन परिसरातील मालधक्का परिसरात ट्रकचालक तसेच परिसरातील लोकांना एका युवकाचा मृतदेह आढळला. चौकशीत तो मृतदेह युसूफ कांबळेचा असल्याचे समोर आले. घटनेची माहिती कळताच रेल्वे लोहमार्गाचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान कांबळे यांच्यासह श्वानपथकातील उपनिरीक्षक एस. आर. आंदुरे, एम. एम. तनपुरे, एस. के. गोरे आणि सी. एन. बागूल हे नैना या श्वानासह घटनास्थळी दाखल झाले. लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून रात्री उशिरापर्यंत संशयितांची चौकशी सुरू होती. 

आठवीचा विद्यार्थी 
युसूफहा बन्सीलालनगरातील महापालिकेच्या शाळेत आठवीत शिकत होता. त्याचे वडील सेंट्रिंगचे काम करतात. तर आई हॉटेलमध्ये काम करते. युसूफच्या पश्चात तीन बहिणी आणि तीन भाऊ असून युसूफ भंगार वेचण्याचे काम करत होता, असे पोलिसांनी सांगितले.  

श्वान घरापर्यंत पोहोचले 
घटनास्थळी दाखल झालेल्या लोहमार्ग पोलिसांनी श्वानपथकाच्या मदतीने मारेकऱ्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. युसूफच्या कानटोपीचा वास घेतलेल्या श्वानने झाडाझुडपांतून जात राजीव गांधीनगरमध्ये पोलिसांना नेले. श्वान जेथे घुटमळले ते घर युसूफचेच निघाले. 
बातम्या आणखी आहेत...