औरंगाबाद- जालना रोडवरील केंब्रिज शाळेच्या पाठीमागे हिरापूर येथे सुरू असलेल्या आर. के. फोर्थ डायमेन्शन या गृहप्रकल्पात फ्लॅट घेणा-या नागरिकांची फसवणूक झाल्याचा आरोप या प्रकल्पात घर घेणा-यांनी केला आहे. पूर्ण पैसे भरल्यानंतर पझेशनसाठी बिल्डरने दिलेल्या तारखेला तब्बल दोन वर्षे उलटली. असे असतानाही आर. के. कॉन्स्ट्रोकडून ग्राहकांना फ्लॅटचा ताबा देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे ग्राहकांनी म्हटले आहे. फ्लॅट बुक केलेल्या नागरिकांनी या विरोधात अपर जिल्हाधिकारी किसन लवांदे आणि ग्रामीण पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच ग्राहक मंचमध्ये धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे. 450 फ्लॅट असलेल्या या गृहप्रकल्पाची 2011 मध्ये सुरुवात झाली.
9 ते 15 लाखांपर्यंत 1 बीएचके आणि 2 बीएचके फ्लॅटची किंमत आहे. बुकिंगसाठीची रक्कम दिल्यानंतर 18 महिन्यांत तुम्हाला घर मिळेल असे आश्वासन संचालक समीर मेहता यांनी दिले होते. त्यानुसार डिसेंबर 2012 मध्ये ग्राहकांनी घराची मागणी केली. मात्र, तेव्हा घर तयार नव्हते. त्यानंतर आतापर्यंत ग्राहकांना वेगवेगळ्या तारखा मिळत गेल्या. बिल्डर आणि ग्राहकांमध्ये फेब्रुवारी 2013 मध्ये झालेल्या बैठकीत वादही झाला होता. या प्रकल्पातील जी. एच. आय. जे या बिल्डिंगचे सेलडीड झाले आहे. मात्र मीटर, पाणी, रस्ते आदी सुविधा देण्यात आल्या नाहीत.यासाठी लागणारे सर्व पैसे मात्र बिल्डरने आधीच घेतल्याचे ग्राहकांनी सांगितले.
ग्राहकांच्या विरोधात बिल्डरने केली पोलिस तक्रार
काम सुरूअसलेल्या ठिकाणी काही ग्राहकांनी येऊन कामगारांना धमकावले आणि जिवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार आर. के. कॉन्स्ट्रोकडून चिकलठाणा पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर सर्व ग्राहक पोलिसांशी बोलले आणि आपली बाजू मांडली. त्यानंतर आर. के. कॉन्स्ट्रोचे संचालक आणि ग्राहक यांच्यात बैठक बोलावण्यात येणार आहे.
ग्राहकांनी वाचला फसवणुकीचा पाढा
2011 मध्ये बुकिंगच्या वेळी 18 महिन्यांत घर देण्याचे बिल्डरकडून आश्वासन.
डिसेंबर 2012 पर्यंत घर मिळाले नाही.
त्यानंतर पुन्हा 24 महिन्यांनंतर घर देण्यात येईल असे सांगण्यात आले.
2014 मार्चमध्येही घराचा ताबा नाही.
राहण्यास कसे जाणार
या गृहप्रकल्पातील एच बिल्डिंगमध्ये माझा 6 क्रमांकाचा फ्लॅट आहे. सेल डीड झाले असले तरी रस्ते, पाणी, मीटर आदी सुविधा देण्यात आल्या नाहीत. मी सध्या भाड्याच्या घरात राहतो. घराचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून या प्रकल्पात घर घेतले होते.
-संभाजी डोंगरे, ग्राहक
तीन वर्षांपासून तारीख
2011 पासून आतापर्यंत चार वेळा वेगवेगळ्या तारखा आर. के. कॉन्ट्रोकडून मिळाल्या आहेत. माझा जी बिल्डिंगमध्ये तिस-या क्रमाकांचा फ्लॅट आहे. सेल डीड झाले आहे. मात्र वीज, पाणी, रस्ते या सुविधा मिळाल्या नाहीत. शिवाय कामही निकृष्ट झाले आहे.
-राजीव वाघ, ग्राहक
माझ्याविरोधात खोटी तक्रार
आतापर्यंत गृहप्रकल्पात काम करणा-या कोणत्याही कर्मचा-यांशी माझा वाद झाला नाही, तरीदेखील बिल्डरने माझ्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली.
- गणेश घुगे, ग्राहक