आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाळीस हजार महिलांना 1.70 कोटींचा गंडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्यभरातील 40 हजार बेरोजगार तरुणी व महिलांना गलेलठ्ठ मानधनाचे आमिष दाखवून अमरावतीच्या पाटोदेकर दांपत्याने 1 कोटी 70 लाखांना गंडवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. रूपाली व हेमराज पाटोदेकर या जोडप्याला 19 जानेवारी रोजी अटक झाली असून, रूपालीला एक महिन्यापूर्वी जामिनावर सोडण्यात आले आहे.

महिलांना प्रशिक्षण देऊन नोकरी व व्यवसाय देण्याच्या नावाखाली ऑगस्ट 2012 मध्ये विविध वर्तमानपत्रांत जाहिरात देण्यात आली. नियुक्त प्रशिक्षणानंतर भारत सरकारच्या किमान वेतन कायदा 1948 अन्वये कार्यक्षम उमेदवारास पदोन्नती व पदनिहाय वेतन भत्ता आणि शासकीय सवलती प्राप्त होतील, असे सांगण्यात आले. विविध पदांसाठी 18,600 ते 32,600 पर्यंत एकत्रित मानधन देण्याचे आमिष दाखवण्यात आले. अर्जासोबत 50 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट किंवा पोस्टल स्टँप पाठवण्याचे आवाहनही होते. त्यानुसार राज्यभरातील 40 हजार तरुणी व महिलांनी महिला व्यवसाय प्रशिक्षण अभियान, विभागीय संचालनालय, जिल्हा परिषद कॉलनी, मोतीनगर, अमरावती या पत्त्यावर अर्ज पाठवले. अर्जासाठी शेवटची तारीख 21 सप्टेंबर होती. हे अभियान भारत सरकार रोजगार व प्रशिक्षण महानिर्देशनालय, र्शम व रोजगार मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याद्वारे प्रमाणित आहे, असे जाहिरातीत म्हटले होते. शिवाय ‘महाराष्ट्र राज्य मुंबई’, ‘सचिवालय’ ‘महाराष्ट्र शासन मान्य’ अशी शासकीय भासणारी भाषा वापरण्यात आल्याने उमेदवारांना भुरळ पडली. जाहिरातीत प्रसिद्ध संकेतस्थळावरही खरी आणि शासकीय वाटेल अशी माहिती होती, असे उमेदवारांनी सांगितले. कोणत्याही एका पदासाठी निवड व्हावी, या अपेक्षेने अनेक उमेदवारांनी किमान 4 ते 5 पदांसाठी अर्ज केले. आश्चर्य म्हणजे एखाद्या तरुणीने चार अर्ज केले असतील तर त्या सर्व पदांसाठी निवड झाल्याचे पत्र त्यांच्या पत्त्यावर पोहोचले.

या नियुक्तीपत्रात शैक्षणिक योग्यतेच्या आधारे गुणवत्ता यादीत विशिष्ट पदासाठी निवड करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. नियुक्तीपूर्वी प्रशिक्षणासाठी उपयुक्त पुस्तके व साहित्य उमेदवारास देण्यात येईल, त्यासाठी एक हजार रुपये भारतीय स्टेट बँकेच्या खाते क्र. 30722627857 जमा करण्याचे सूचित करण्यात आले. राज्यात सुमारे 15 हजार उमेदवारांनी प्रत्येकी एक हजार रुपये जमा केले आहेत. नियुक्तीपूर्व प्रशिक्षण आदेशासोबत बँकेची स्लिपही जोडण्यात आलेली होती. प्रशिक्षणाचा कालावधी व ठिकाण याबाबत अद्याप उमेदवारांना कळवण्यात आले नाही.

6 लाख नव्हे 40 हजार अर्ज
नोकरीच्या गरजेमुळे राज्यातून 6 लाख नव्हे 40 हजार अर्ज आले. 15 हजार महिलांनी प्रशिक्षणासाठी प्रत्येकी एक हजार रुपये भरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पाटोदेकर दांपत्यांने फसवणूक केल्याचे उघड झाले असून त्यांचे आर्थिक व्यवहार गोठवण्यात आले आहेत. मुंबई, पुणे, मराठवाड्यातूनही विविध पदांसाठी अनेक महिलांनी अर्ज केले आहेत. घोटाळ्याची व्याप्ती जास्त असून फसवणूक झालेल्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस आयुक्त कार्यालय, कॅम्प, अमरावती येथे तक्रार द्यावी.
- महेश ठाकूर, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, अमरावती.

गृहमंत्र्यांना भेटणार
मराठवाड्यात पहिलेच दुष्काळ असताना या भागातील अनेक तरुणींना प्रत्येकी एक हजार रुपयांना गंडवण्यात आले. जाहिरातीत सर्रास शासकीय भाषेचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणी लवकरच महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड, गृहमंत्री आर. आर. पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार आहे. फसवणूक झालेल्यांना तत्काळ व्याजासह त्यांचे पैसे परत करावेत, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांनी दिला. तर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आंदोलन सुरू केले असून महिला व तरुणींना न्याय मिळवून देणार असल्याचा निर्धार संघटनेचे प्रदेश सरचिटणीस संतोष मगर यांनी व्यक्त केला.

या पदांचे दाखवले आमिष
पद जागा
प्रशिक्षण अधिकारी 66
जनसंपर्क अधिकारी 121
प्रशिक्षण सहाय्यक 139
निरीक्षक 79
अधीक्षका 122
अकाऊंटंट 82
कॉम्प्युटर शिक्षिका 92
सव्र्हेक्षक 86
आरोग्य प्रशिक्षिका 130
कॉम्प्युटर ऑपरेटर 74
लिपिक 76
पाळणाघर सहाय्यक 168
शिपाई 33
मॉन्टेसरी/बालवाडी शिक्षिका 282
शिवणकाम शिक्षिका 261
ब्युटीपार्लर शिक्षिका 113
प्रि प्रायमरी टिचर 142
जनसंपर्क सहाय्यक 62