आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सच्या पर्यटकाचा पासपोर्ट पळवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेल्या फ्रान्स येथील महिलेचा पासपोर्ट, क्रेडिट कार्डसह नगदी रक्कम चोरट्यांनी बुधवारी लांबवल्याने पर्यटक दांपत्याने खुलताबाद पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे, तर पासपोर्ट चोरीस गेल्याने या पर्यटकांची मोठी अडचण झाली आहे.

फ्रान्समधील पॅरिस येथील पती अँटिओनी डुमॅरटीअर व पत्नी इव्हा टेमॉइन हे दोघे ५ महिन्यांसाठी २६ नोव्हेंबरपासून भारत दौऱ्यावर आलेले आहेत. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मुंबई, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, चेन्नई, पुदुचेरी आदी ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. यानंतर ६ जानेवारी रोजी हे दोघे बसने मुंबई येथून निघून रात्री १२ वाजता औरंगाबाद बसस्थानकावर पोहोचले. औरंगाबाद बसस्थानकावरून रात्री २ वाजता वेरूळ लेणीकडे त्यांनी बसने प्रवास करून वेरूळ गाठले व रात्री मुक्कामासाठी त्यांना कुठेही जागा न मिळाल्याने त्यांनी वेरूळ येथील विश्रामगृहात आराम केला. सकाळी उठल्यानंतर त्यांनी आपल्या बॅगची पाहणी केली असता इव्हा टेमाॅइन यांच्या बॅगेतील पासपोर्ट, क्रेडिट कार्ड व नगदी २ हजार ५०० रुपये कोणी तरी लंपास केल्याचे निर्दशनास आले. यानंतर या जोडप्याने बुधवारी सकाळी खुलताबाद पोलिस ठाणे गाठून पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. त्यांना नवीन पासपोर्ट तत्काळ मिळावा यासाठी पोलिस ठाण्यातर्फे त्यांना पासपोर्ट हरवल्याचे पत्र देण्यात आले आहे.

पासपोर्ट हरवल्यामुळे हे दांपत्य अडचणीत सापडले असून पर्यटन सोडून या दांपत्याने थेट मुंबई गाठली आहे. वेरूळ लेणी पाहिल्यानंतर ते अजिंठा लेणीस भेट देऊन राजस्थान, बनारस पाहिल्यानंतर १५ एप्रिल रोजी नेपाळला रवाना होणार होते. त्यांच्या म्हणण्यानुसार बसमध्ये प्रवास करतानाच पासपोर्ट चोरट्यांनी पळवला असावा.