आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नलला मिळाला न्याय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - लॉटरी लागल्याचा ई-मेल पाठवून परप्रांतीय भामट्यांनी लष्करातील एका निवृत्त कर्नलला पावणेचार लाखांना गंडवले होते. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रयत्नामुळे न्यायालयाकडून या अधिका-यास ही रक्कम परत मिळाली आहे.
पडेगाव येथील माजी लष्करी अधिकारी वाय. एस. अहलावत यांना पाच महिन्यांपूर्वी आयसीआयसीआय बँकेकडून 4 लाख 50 हजार पौंड म्हणजेच 2 कोटींची लॉटरी लागल्याचा ई-मेल आला होता. लॉटरीची रक्कम भरमसाट असल्यामुळे त्यांना ती मिळवण्यासाठी आयसीआयसीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस आणि एसबीआय या बँकांच्या खात्यांवर रक्कम भरण्याचे वारंवार सांगण्यात आले होते. त्यांच्या सांगण्यानुसार अहलावत यांनी 3 लाख 94 हजार रुपये बँकांमध्ये भरले. पुन्हा काही दिवसांनी त्यांना मोबाइल आला आणि 1 लाख 70 रुपये भरण्याचे सांगण्यात आले. या वेळी मात्र त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी चौकशी केली. आपण फसलो असल्याचे कळताच त्यांनी थेट आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. 6 सप्टेंबर 2011 रोजी या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करणारे छावणी ठाण्याचे निरीक्षक ज्ञानोबा मुंडे आणि आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी तत्काळ या बँकेतील खाती गोठवली होती. बँकांना अहलावत यांनी भरलेली रक्कम सरकारी खात्यात वळती करण्याचे पत्र दिले होते. तसेच ही रक्कम सीझही करण्यात आली होती. अहलावत यांनी भरलेली रक्कम भामटे त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर जमा करीत होते. अनेकदा पत्रव्यवहार केल्यानंतर पावणेचार लाखांची रक्कम बँकेने सरकारी खात्यात जमा केली.
इंजिनिअरलाही गंडवले होते - दुस-या एका घटनेतही याच प्रकारचा तपास आर्थिक गुन्हे शाखेने केलेला आहे. ग्रीव्हज कंपनीतील मेकॅनिकल इंजिनिअर अजय खडकीकर (रा. श्रेयनगर) यांना ई-मेल आला होता. त्यांना विदेशात कोणत्याही ठिकाणी नोकरी देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. हा ई-मेल पाहून त्यांनी बायोडाटा मेल केला होता.
यानंतर दोन दिवसांनी त्यांना नियुक्ती झाल्याचा ई-मेल पाठवण्यात आला होता. व्हिसाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी 25 टक्के रक्कम कंपनी भरणार असून, उर्वरित रक्कम उमेदवाराला भरण्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार पहिल्यांदा खडकीकर यांनी 25 हजार रुपये बँक आॅफ इंडियाच्या खात्यात भरले होते. पैसे भरल्यानंतर त्याची पावती ई- मेल करण्यात आली होती. यानंतर व्हिसाच्या प्रोसेससाठी पुन्हा 65 हजार रुपयांचा भरणा खडकीकर यांनी केला होता. तसेच व्हिसा मिळण्यासाठी आता पुन्हा 65 हजार रुपये भरा, असा ई-मेल त्यांना पाठवण्यात आला. अशी 1 लाख 55 हजारांची रक्कम भरल्यानंतर त्यांना 70 हजार भरण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या वेळी त्यांना दुस-याच बँक खात्याचा क्रमांक ई-मेल करण्यात आला होता.
घोटाळा असल्याचे लक्षात आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडे त्यांनी धाव घेतली. आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी भामट्यांनी मेल केलेल्या खाते क्रमांकांची चौकशी करून तत्काळ या खात्यावरील रक्कम गोठवली. बंगलोर, कर्नाटक आणि ओरिसा या राज्यातील बँकांमध्ये या भामट्यांनी खाती उघडली होती. ही खाती गोठवल्यानंतर बँकांना पत्रे पाठवून पोलिसांनी त्याचा पाठपुरावा केला. बँकेने ही रक्कम शासकीय खात्यात जमा केली.