आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॉलिसीच्या नावाखाली गंडवले; लुबाडणारी टोळी औरंगाबादेत कार्यरत?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शासकीय आणि खासगी विमा कंपन्यांच्या विमाधारकांची माहिती गोळा करून शहरातील एका व्यापार्‍याकडून पंधरा हजार रुपये लुबाडल्याची घटना घडली.

शहरात कार्यरत असलेल्या टोळीकडे वेगवेगळ्या विमा कंपन्यांचा डाटा अपडेट असून त्या आधारे लोकांची फसवणूक करत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया लाइफ इन्शुरन्स पॉलिसीवर बोनस देण्याच्या आमिषाला बळी पडून हडकोतील नीळकंठ खर्चे यांना 15 हजार रुपयांना फसवले, तर टाटा एआयजी विम्याचा हप्ता थकल्याचे सांगून पदमपुर्‍यातील रहिवासी सदाशिव केरे यांना 14 हजार 804 रुपयांना फसवण्यात आले. केरे यांनी दिलेल्या धनादेशावर खाडाखोड करून रोहितकुमार आरोरा नावाने तो वटवण्यात आला. यासाठी केरे यांना 12 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीहून संपर्क साधण्यात आला होता. आमचा एजंट घरी येईल त्यांना चेक द्या, असे सांगण्यात आले होते. 16 डिसेंबर 2012 रोजी एक व्यक्ती आली आणि 14 हजार 804 रुपयांच्या धनादेशासह एक धनादेश घेतला. रक्कम तुमच्या खात्यावरून दर महिन्याला वर्ग होईल, असे सांगण्यात आले. केरे यांनी दिलेला धनादेश 20 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीतील महाराष्ट्र बँकेतून ट्रान्सफर करून तो आयडीबीआय बँकेतून वटवण्यात आला. वास्तविक पाहता केरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील महाराष्ट्र बँकेचा धनादेश दिला होता. काही दिवसांनंतर त्यांना राकेश राणा यांचा फोन आला. तुम्ही पोलिसांत तक्रार देऊ नका. तुमचे पैसे खात्यावर जमा होतील. आमच्या टाटा एआयजी कंपनीचे नाव बदलले असून, आता एआयए लाइफ झाले आहे. रोहितकुमार अरोरा हे आमच्या कंपनीचे नाशिक शाखेचे व्यवस्थापक आहेत. त्यांचे आणि तुमचे नाव सारखेच असल्यामुळे ही अडचण निर्माण झाली असल्याचे राणा यांनी सांगितले.

चेकचा प्रवास
खर्चे प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आयडीबीआय बँकेच्या अधिकार्‍यांची चौकशी केली. वटवण्यात आलेल्या धनादेशाचा प्रवास कसा झाला याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी किशोर बारड यांना ताब्यात घेतले होते. सोमवारी सदाशिव केरे यांची दुसरी तक्रार आली.

गुन्हा दाखल करू
घरपोच सेवेच्या आमिषात नागरिकांची फसवणूक होते आहे. धनादेश बँकेत भरला तर फसवणूक टळेल, खर्चे यांच्या प्रकरणात धनादेशाचा प्रवास कसा झाला. याची चौकशी करत आहोत. बँकेकडून माहिती प्राप्त होताच गुन्हा दाखल होणार आहे. अविनाश आघाव, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा