आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समृद्धी’ फायनान्सला कर्मचार्‍यांचा गंडा; एकाला अटक, एक फरार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बीड बायपास येथील भारतीय समृद्धी फायनान्स लि. कंपनीतील दोन कर्मचार्‍यांनी ग्राहकांकडून परस्पर कर्ज वसूल करून कंपनीला दोन लाख 89 हजार 793 रुपयांचा गंडा घातला आहे. ही बाब व्यवस्थापकांच्या लक्षात आल्यानंतर सोमवारी सातारा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जवाटप आणि वसुलीसाठी नियुक्त केलेल्या या दोन कर्मचार्‍यांनी एका वर्षाच्या काळात हा घोटाळा केला. त्या दोघांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे.

बीड बायपास रोडवर भारतीय समृद्धी फायनान्स कंपनीची शाखा आहे. त्याचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे आहे. या कंपनीत शरद रगडे (21, रा. एन-12 सिडको) आणि ज्ञानेश्वर हरिश्चंद्रे (25, रा. लासूर, ता. वैजापूर) यांची 1 जानेवारी 2011 पासून कर्जवाटप आणि वसुलीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्या दोघांनी अनेक जणांना कर्जवाटप केले तसेच वसूलही केले. पण वसूल केलेल्यांपैकी अनेकांचे पैसे त्यांनी कंपनीच्या खात्यावर जमा केले नाहीत. 1 जानेवारी 2011 ते 30 जून 2012 या कालावधीत रगडे याने 1 एक लाख 15 हजार 870 रुपयांचा, तर हरिश्चंद्रे याने एक लाख 37 हजार 923 रुपयांचा अपहार केला. तसेच कंपनीने दिलेल्या पावत्यांमध्ये खाडाखोड करून त्या कंपनीला सादर केल्या. कंपनीचे व्यवस्थापक विनायक अरविंद देशपाडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक एम.बी.टाक पुढील तपास करीत असून रगडेला अटक केली आहे. या दोघांनी ग्राहकांकडून पैसे घेतले, मात्र पावत्या दिल्या नाहीत, अशा तक्रारी काही ग्राहकांनी कंपनीकडे केल्या होत्या. तेव्हा हा अपहाराचा गुन्हा पुढे आला. रगडे याला अटक झाली असून हरिश्चंद्रे याचा पोलिस शोध घेत आहेत.