आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहेबांचा फोन आला अन् त्यांनी ट्रक सोडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एकतर विशिष्ट वेळेत अवजड वाहनांना बंदी, पर्यावरणाच्या दृष्टीने वाळू वाहतुकीवरही बंदी. त्यात विनानंबर वाहन असे तीन तीन गुन्हे करून शहरात सर्रास वाळूची वाहतूक होत आहे. डीबी स्टार सातत्याने याचा पाठपुरावा करत आहे. शुक्रवारी संध्याकाळी पुन्हा एकदा छापा टाकून डीबी स्टारने अशा दोन वाहनांचा पर्दाफाश केला. पोलिसांनी एक ट्रक पकडला, पण साहेबांचा फोन येताच सोडून दिला. तर असाच दुसरा ट्रक जात असल्याचे दिसत असतानाही तो सोडून दिला.
मुळात शहरात वाळूची वाहतूक करण्यालाच बंदी आहे. पर्यावरण समितीने अजूनही त्याबाबत परवानगी दिलेली नाही तरीही चोरट्या वाळूची वाहतूक बिनधास्तपणे सुरू आहे. पैठण रोड, नगर नाका, हर्सूल नाका, झाल्टा फाटा, जालना रोड, चिकलठाणा आदी मार्गांवरून वाळूची तस्करी होते. पण पोलिस, जिल्हा प्रशासन आणि आरटीओ कार्यालय मात्र कारवाई करत नाही.
या वाळूच्या ट्रकवरही नंबरप्लेट नाही.

विनानंबरचा हा वाळूचा ट्रक पकडल्यावर ट्रक मालक लगेच घटनास्थळी दाखल झाले.
जालना जिल्ह्यातून एमएच २० डीई २१२२ या क्रमांकाचे वाहन वाळू घेऊन संध्याकाळी चारच्या सुमारास शहरात आले. शिवाजीनगर, सूतगिरणी चौक, गजानन मंदिरकडून सेव्हन हिल्सच्या दिशेने निघाले होते. देवळाई चौक आणि सूतगिरणी चौकात पोलिसांनी हे वाहन अडवले नाही. पुढे सिडको वाहतूक शाखेचे हेडकॉन्स्टेबल शेषराव गवळी, संजय तुपे यांनी काही अंतरावर कडा कार्यालयासमोर हा ट्रक पकडला. वाहनचालक अण्णा दळवी यांनी फोनाफोनी केली. वाहनमालकाने तेथे येऊन शिंदे साहेबांचा फोन आहे म्हणत पोलिसांना फोन दिला. त्याच वेळी डीबी स्टार चमू तेथे हजर जाला. अखेर पोलिसांनी ६०० रुपयांची दंड करून वाहन सोडले.
याच मार्गावरूनच याच वेळी वाळूने भरलेला दुसरा ट्रक आला. मात्र, पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करत तो जाऊ दिला. वास्तविक पाहता अवजड वाहनांना या वेळेत शहरात प्रवेश बंदी आहे. दुसरी बाब म्हणजे वाळू वाहतूकही बंद आहे. पण सेव्हन हिल्स मार्गावरून थेट एन-१ मधील एका बांधकामावर ते वाहन खाली करण्यात आले. दरम्यान, सिडको एन-१ च्या पोलिस चौकीसमोरच या वाहनामुळे वाहतुकीला मोठा अडथळा झाला. किमान अर्धा तास येथे वाहतूक ठप्प झाली, पण तरीही चौकीतील पोलिसांनी कुठलीही कारवाई या ट्रकवर केली नाही.

आम्ही वाहतूकशाखेच्या नियमाप्रमाणे एका वाहनावर कारवाई केली. मात्र, चौकात वाहतूक जाम झाल्याने दुसऱ्या वाहनावर कारवाई करता आली नाही. -शेषरावगवळी, संजयतुपे (पोलिस, वाहतूक शाखा)

कालछावणी परिसरात अशाच दोन वाहनांवर कारवाई केली. जर मार्गावर रेती वाहन दिसले तर महसूल विभागाला पोलिसांनी कळवायला हवे. कळवले असते तर ती वाहने आम्ही जप्त केली असती. -विजयराऊत, अपर तहसीलदार

जप्तीचा नियम, तरीही..
एकतर वाळूचे वाहन दिसले तर ते जप्त करून महसूल विभागात ठेवायला हवे. पण महसूल विभागाला याची खबरही नाही. पोलिसांनीही ती देण्याची तसदी घेतली नाही. अवजड वाहन शहरात घुसवून नियम धाब्यावर बसवला. दुसरे म्हणजे चोरटी वाळू आणल्याच्या नियमालाही फाटा देण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...