औरंगाबाद - ग्राहकांना साफसफाईचे साहित्य विकणाऱ्या व्यापाऱ्याच्या हातातील ७७ हजार रुपयांच्या नोटांचे बंडल हिसकावून हेल्मेटधारी चोरटा पसार झाला. ही घटना शुक्रवारी चेलीपुरा भागातील पोरवाल सेल्स एम्पोरियममध्ये घडली. या घटनेमुळे चोरटे ओळख लपवण्यासाठी हेल्मेट वापरू लागल्याचे स्पष्ट झाले असून व्यापारी, नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
विनाेद चंदनलाल जैन यांनी शुकवारी दुपारी नवीन साहित्य आणण्यासाठी दुकानाच्या गल्ल्यातील सर्व रक्कम बाहेर काढून ती मोजू लागले. याच वेळी काळ्या रंगाचे हेल्मेट घातलेला एक ३० ते ३५ वर्षांचा एक जण दुकानात आला. त्याने एक लिटर फिनाइलची मागणी केली. जैन यांचे लक्ष थोडे विचलित होताच त्याने त्यांच्या हातातील बंडल हिसकावून पळ काढला. दुकानासमोरच त्याचा दुसरा साथीदार दुचाकी सुरू ठेवून थांबला होता. हा चोरटा धावतच दुचाकीवर बसला. दुकानातील एका मुलाने चोरट्याचा पाठलाग केला असता एका चोरट्यानेे त्याच्यावर लोखंडी सळईने वार केला. त्यामुळे तो थबकला. याचा फायदा घेत चोरटे पसार गेले. या घटनेची माहिती मिळताच सिटी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. जैन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीसीटीव्हीत चोरटे कैद
१९९० पासून जैन यांचे दुकान आहे. खबरदारी म्हणून त्यांनी दुकानात सीसीटीव्ही बसवले आहेत. यातील एका सीसीटीव्हीमध्ये हेल्मेट घालून आलेला चोरटा कैद झाला आहे. मात्र, कॅमेऱ्याचे रिझोल्युशन कमी असल्यामुळे दुकानाखाली उभ्या चोरट्याचा चेहरा आणि गाडीचा नंबर कॅमेऱ्यात कैद होऊ शकला नाही.