आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन कोटींच्या ठेवी.. ‘लाभ’ न देताच ‘शुभ कल्याण’चा पोबारा; राज्यभरात 103 शाखाही बंद?, ठेवीदार चिंतेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही आहे सोसायटीची गुलमंडीतील बंद असलेली शाखा. दुसरे छायाचित्र सोसायटीचे ब्रोशर. त्यात गुंतवणूकदार जाळ्यात अडकतील, अशी माहिती पाहायला मिळते. - Divya Marathi
ही आहे सोसायटीची गुलमंडीतील बंद असलेली शाखा. दुसरे छायाचित्र सोसायटीचे ब्रोशर. त्यात गुंतवणूकदार जाळ्यात अडकतील, अशी माहिती पाहायला मिळते.
औरंगाबाद- नऊ महिन्यांमध्ये चौपट परताव्याचे आमिष दाखवून शहरातून जवळपास तीन काेटी रुपयांच्या ठेवी गोळा करून शुभ कल्याण मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने पोबारा केला आहे. या सोसायटीच्या शहरामध्ये तीन शाखा असून यातील दोन बंद करण्यात आल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून या शाखा बंद झाल्याने सर्व ठेवीदार चिंताग्रस्त झालेे आहेत, तर या संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी प्रशासकीय प्रमुख ‘आऊट आॅफ कव्हरेज’ आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील हावरगाव येथील दिलीप आपेट यांनी २०११ मध्ये शुभ कल्याण मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी सुरू केली. राज्यभरात या सोसायटीने तब्बल १०३ शाखा सुरू केल्या. विश्वास बसणार नाही, अशा परताव्याच्या जाहिराती केल्या. कर्मचाऱ्यांमार्फत योग्य मार्केटिंग करून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या.

औरंगाबाद शहरामध्ये मुकुंदवाडी, टीव्ही सेंटर, गुलमंडी येथे शाखा उघडल्या होत्या. या तीन शाखांच्या माध्यमातून दोन वर्षांत साधारणत: तीन कोटी रुपयांच्या मुदत ठेवी जमा केल्या. सहा महिन्यांपासून या सोसायटीचे व्यवहार गडबडले. मुदत पूर्ण झालेल्या ठेवीदारांनी सोसायटीच्या शाखेत पैशांसाठी चकरा सुरू केल्यानंतर प्रत्येक वेळी त्यांना एक महिन्यात पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सुरू होता. या काळात शाखेसाठी भाड्याने घेतलेल्या इमारतींचे भाडे कर्मचाऱ्यांचे वेतनही थकले आणि मार्च महिन्यात टीव्ही सेंटर येथील शाखेला कुलूप लावले, तर गुलमंडी येथील शाखा मागील दरवाजाने उघडून कर्मचारी बसतात. मात्र, व्यवहार पूर्णपणे ठप्प आहेत. 

आकर्षक परताव्याचे आमिष 
यासोसायटीने ब्रोशर्स छापून ठेव योजनांची जाहिरात केली होती. यामध्ये चार वर्षे नऊ महिन्यात दुप्पट, सात वर्षे पाच महिन्यात तिप्पट तर नऊ वर्षांत चौपट परतावा देण्याचे आश्वासन होते. तसेच कन्यादान योजनेत १५ हजार गुंतवल्यास १२ वर्षांनी एक लाख रुपये मिळतील, असे सांगण्यात आले होते. नियमित ठेवींवर चार टक्यांपासून ते १७ टक्क्यांपर्यंत व्याजदर देण्यात येईल, असेही ब्रोशर्समध्ये नमूद होते.
 
तीन कोटींवर गुंतवणूक 
आकर्षकपरतावा मिळेल, या आशेने शहरातील अनेक व्यापारी, ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक केली होती. तीन शाखांपैकी गुलमंडी शाखेत अधिक म्हणजे दीड कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. टीव्ही सेंटर आणि मुकुंदवाडी या दोन शाखांमध्ये सुमारे दीड कोटी असे मिळून शहरातील नागरिकांनी तीन कोटी रुपयांच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. ़

शाखाबंद, तक्रारींचा पाऊस 
शाखाबंद झाल्यानंतर ठेवीदारांना फसवणूक झाल्याची जाणीव होऊ लागली आहे. काहींनी एकत्र येऊन पोलिस आयुक्त, जिल्हा सहकार निबंधकांसह केंद्रीय कृषीकल्याण सहकार विभागाच्या सहसचिवांकडे तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, या प्रकारामुळे ज्या कर्मचाऱ्यांनी, पिग्मी एजंट्सनी ठेवी जमा केल्या होत्या, त्यांना ठेवीदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
 
सर्वत्रच व्यवहार ठप्प 
या सोसायटीसंदर्भात ठेवीदारांनी तक्रारी केल्यानंतर डीबी स्टार चमूने सोसायटीच्या इतर सर्व शाखांचीही माहिती घेतली असता सगळीकडे हीच स्थिती असल्याचे समोर आले. केवळ औरंगाबादच नव्हे तर या साेसायटीच्या एकूण १०३ शाखा आहेत. सर्वच शाखांमधील व्यवहार मागील सहा महिन्यांपासून ठप्प आहेत. त्यामुळे सर्व ठेवीदार हवालदील झाले आहेत. 

कोण आहेत सोसायटी अध्यक्ष? 
यासोसायटीचे अध्यक्ष दिलीप आपेट हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील हावरगाव येथील असून त्यांचा वावर बीड जिल्ह्यातच अधिक असतो. भाजपमधील काही नेत्यांसोबत उठबसही असते. आपेट यांनी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये शंभू महादेव नावाने खासगी साखर कारखानाही काढला असून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्येही दुसऱ्या कारखान्याची उभारणी ते करत आहेत. 

अध्यक्षांसह मुख्य शाखाही नॉट रिचेबल 
यासंदर्भात सोसायटीची बाजू समजून घेण्यासाठी चमूने शुभ कल्याण सोसायटीच्या मुख्य शाखेशी अनेकदा संपर्क साधला. तसेच अध्यक्ष दिलीप आपेट यांच्या वैयक्तिक मोबाइलवरही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही. विशेष म्हणजे सोसायटीच्या अधिकृत मेलवरूनही संपर्क केला, परंतु मेलवरही कुठलेच उत्तर आले नाही. 
 
 

मल्टिस्टेट क्रेडिटसोसायटीला परवानगी केंद्रीय सहकार विभागाकडून मिळते. सोसायटीच्या कामकाजावरही त्यांचीच देखरेख असते. त्यामुळे या प्रकरणात आम्हाला कारवाईचे कुठलेही अधिकार नाहीत. सर्व ठेवीदारांनी केंद्रीय सहकार विभागाकडे तक्रारी नोंदवल्यास संबंधित सोसायटीवर नक्कीच कारवाई होऊ शकेल. 
- देवयानी वाणी, प्रभारीजिल्हा उपनिबंधक, सहकार विभाग 

ठेवीदारांच्या ठेवीचकाय, सहा महिन्यांपासून आमचे पगार देखील थकलेत. रोज ठेवीदारांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने ते कधीही अंगावर धावून येतात. या प्रकरणी आम्ही मुख्य शाखेशी संपर्क साधल्यास आम्हाला पुढील महिन्यात नक्की पैसे देऊ, असे उत्तर येते. हा प्रकार मागील सहा महिन्यांपासून सुरू आहे. 
-एका शाखेचे मॅनेजर (विनंतीवरून मॅनेजरचेनाव टाळले आहे) 

बिटवीन लाइन: कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका 
असे प्रकार अनेकदा होतात. अशीच एखादी क्रेडिट सोसायटी उगवते आणि काही वर्षांतच रक्कम दुप्पट वा चौप्पट करून देण्याचे आमिष दाखवते. लोक कष्टाने कमावलेली पुंजी गुंतवतात आणि फसतात. आर्थिक गणिते जाणून घेतलीच पाहिजेत. कुठलीही संस्था असा पैसा देऊच शकत नाही. झपटप पैसा नाही मिळाला तरी चालेल पण निदान आपला आहे तो पैसा तरी गमावू नये. झटपट कमावण्याचे हे सारे फंडे बहुतांश वेळा फसवेगिरीचेच असतात, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे सतर्क राहणेच योग्य.
 
पुढील स्लाइडवर वाचा काय म्हणतात ठेवीदार? 
बातम्या आणखी आहेत...