आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएनएल, पीडब्ल्यूडीची बनावट नियुक्तिपत्रे देऊन 9 लाखांना गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- राज्याच्या अपर सचिवांची बनावट सही करून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून पाच जणांना लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशांत दिनकर जंजाळ (३३, रा. लासुरा, शेगाव) असे मुख्य आरोपीचे नाव असून वैभव भगवान भोसले (१९, रा. करंजवन, ता. दिंडोरी) असे त्याच्या सहकाऱ्याचे नाव आहे. प्रशांतने मायक्रोबायोलॉजीमध्ये पदवी घेतली असून अजय पाटील या नावाने तो ओळख करून देता होता. या बनावट नावाचे त्याच्याकडे ओळखपत्रही आढळून आले आहे. 


अनिल साहेबराव जाधव (२९, राजेंद्रनगर) यांचे ठाकरेनगर येथे कॉम्प्युटर आणि झेरॉक्स इन्स्टिट्यूट आहे. आरोपी प्रशांत हा अनेकदा कामानिमित्त अनिल यांच्याकडे जात असे. यातून त्यांची चांगली ओळख झाली. स्वत:ला मोठा पुढारी असल्याचे सांगत माझी सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल खाते, आरटीओ आदी ठिकाणी खूप ओळख आहे. माझ्या एका शब्दावर कामे होतात, अशा थापा त्याने मारल्या. अनिल यांनी त्यावर माझ्या मेहुण्यासाठी आम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहोत. त्याचे कुठे काम होईल का, असे विचारले. तेव्हा प्रशांत त्यांना पुण्याच्या आरटीओमध्ये लावून देतो. त्यासाठी सात लाख रुपये द्या, असे सांगितले. अनिल यांचा विश्वास बसला, परंतु नोकरीचे नियुक्तीपत्र आल्यावर आम्ही रक्कम देऊ, असे सांगितले. त्यापूर्वी त्यांनी ३० हजार रुपये रोख आणि लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश दिला. 


काही दिवसांनी प्रशांतने त्यांना त्यांच्या मेहुण्याच्या नावे पुण्याच्या आरटीओमध्ये नियुक्तीचे पत्र दिले. त्यावर अपर सचिवासह आरटीओ अधिकाऱ्यांच्या सह्या होत्या. त्यामुळे तक्रारदाराने उर्वरित रक्कम देऊन टाकली. तक्रारदाराचा मेहुणा नियुक्तीपत्र घेऊन पुण्याच्या आरटीओत गेला. परंतु अशी कुठलीच नियुक्ती आमच्याकडे होत नसल्याचे त्यांना कळाले आणि हा प्रकार समोर आला. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघेही शुक्रवारी सकाळी शहरात येत असल्याची माहिती खबऱ्याने गुन्हे शाखेला दिली. त्यानुसार हमालवाडा येथे सापळा रचून दोघांना पथकाने अटक केली. त्यांची कारही पोलिसांनी जप्त केली. त्यांनी पाच जणांना असाच गंडा घातल्याचे समोर आले आहे. सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात, निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल वाघ, हवालदार नितीन मोरे, मनोज चौहान, भगवान शोलोटे, शेख हकीम, ज्ञानेश्वर पवार, संजय खोसरे, संतोष सूर्यवंशी, भावसिंग चव्हाण, अनिल मोरे यांनी तपासात भूमिका बजावली. 

बातम्या आणखी आहेत...