आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजीवाल्यांना मोफत पिशव्या, ३० बचत गटांना मिळाले काम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - "दिव्य मराठी'ने सुरू केलेल्या कापडी पिशवी अभियानाला समाजातील प्रत्येक स्तरातून बळ मिळू लागले आहे. शहरात होणारा बदल आणि अभियानात उतरलेल्या संस्था, संघटना, मंडळे, शाळा-महाविद्यालयांची संख्या पाहून ‘आधी मनातून मग हातातून’ हे ब्रीद सत्यात उतरताना दिसत आहे. आता कापडी पिशवीला प्रतिष्ठा मिळू लागली आहे. कॅनॉट शक्ती मंडळाने घरातील जुने कपडे देत ३० बचत गटांकडून पिशव्या शिवून घेतल्या. यातून बचत गटांना काम आणि भाजी विक्रेत्यांना मोफत पिशव्या मिळाल्या.
कापडी पिशवी पर्यावरणाला हातभार लावू शकते. यासाठी फार मोठा खर्च करण्याची गरज नाही, तर फक्त आपल्या दैनंदिन जीवनात कापडी पिशवी वापरण्याची सवय आत्मसात करणे आवश्यक आहे. आता ही जाणीव शाळकरी आणि महाविद्यालयीन मुले, महिला मंडळे, स्वयंसेवी संस्था यांना प्रकर्षाने झाली आहे. म्हणूनच दररोज शहराच्या विविध भागांमध्ये या संस्था मोफत कापडी पिशवी देऊन प्लास्टिकऐवजी कापडी पिशवी वापरा, असा उत्स्फूर्त प्रचार-प्रसार करताना दिसत आहेत. एवढेच नाही तर भाजीवाले, फळविक्रेते, दुकानदारांनाही पिशव्या देऊन कापडी पिशव्यांचा आग्रह करा, असे आवाहन केले जात आहे. पूर्वी कापडी पिशवी घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या १० ते १५ टक्के होती. ती आज ८० ते ८५ टक्क्यांवर पोहोचली आहे.

जुनेकपडे केले गोळा : कॅनॉटशक्ती मंडळाने प्लास्टिकमुळे होणारी हानी, कापडी पिशवीमुळे होणारा फायदा समजावून सांगितला. जुने कपडे देण्याचे आवाहन केले. मोठ्या प्रमाणात जुने कपडे गोळा होताच ३० महिला बचत गटांकडे हे कपडे सोपवले. बचत गटांनी वाजवी किमतीत पिशव्या शिवून दिल्या. नुकतीच २५० पिशव्यांची ऑर्डर त्यांनी पूर्ण केली आहे.

संक्रांतीला जरींच्या पिशव्यांचे वाटप
यंदाच्या संक्रांतीला शहरातील विविध मंडळांमध्ये कापडी पिशव्या वाण म्हणून वाटण्यात येणार आहेत. जरीकाठाच्या आणि कल्पक पिशव्या वाण म्हणून देण्याची योजना शक्ती मंडळाने आखली आहे. यासाठी खास डिझायनर पिशव्यांची निर्मिती केली जाणार आहे.

यांनी घेतला सहभाग
वैशाली टाकळकर, स्वाती साळुंके, किरण काळे, संगीता साळुंके, दीपाली बेंद्रे, मंगल देशमुख, वर्षा भालेराव, चित्रा उडाणशिव, केतकी चौधरी, प्रफुल्लता फुलारी, अनुराधा सूर्यवंशी, सुलभा तिळवे, कल्पना गुरव यांनी अभियानात सहभाग घेतला आहे.

मोफत पिशव्या
^आमच्याग्रुपच्या२५ सदस्यांनी प्रत्येकी २० पिशव्या शिवून घेतल्या आहेत. ज्या भाजीवाल्याकडून आम्ही भाजी घेतो, त्याला या पिशव्या मोफत देत आहोत. इतरांना पिशवी घेऊन या असे आवाहन करा, अशी विनंतीही भाजीवाल्यांना करत आहोत. - स्वाती स्मार्त, अध्यक्षा,कॅनॉट मंडळ