आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅनिटरी नॅपकिन मोफत देऊन जनजागृती करण्यात येत आहे. - Divya Marathi
सॅनिटरी नॅपकिन मोफत देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
शिऊर- ग्रामीण भागातील महिला आणि किशोरवयीन मुलींनी आरोग्याची योग्य काळजी कशी घ्यावी तसेच पाच दिवस सॅनिटरी नॅपकिनचाच आवर्जून वापर केला जावा यासाठी शहरातील तरुण-तरुणींना सोबत घेत दीड हजार लोकसंख्येच्या गावात वाडी, वस्ती, तांड्यावर जाऊन नॅपकिनविषयी जनजागृती करण्याचे काम प्रा. सुधाकर पवार आणि सुशीला पवार या दांपत्याने हाती घेतले आहे. 
 
सरस्वती भुवन शारदा मंदिर १९९२ च्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅच तसेच एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना सोबत घेत कोल्ही ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्यविषयक पहिल्याच उपक्रमाला रविवारपासून (२३ एप्रिल) सुरुवात करण्यात आली. त्यास गावातील किशोरवयीन मुली आणि महिलांचा प्रतिसाद मिळाला आहे. शासन स्तरावर प्रभावीपणे उपाययोजना त्याची अंमलबजावणी होत नसल्याने ५०० महिला आणि युवतींना सॅनिटरी नॅपकिन्सचे महत्त्व पटवून देत जनजागृती करून दोन महिन्यांसाठी मोफत पुरवठा करण्याचा उपक्रम प्राध्यापक सुधाकर पवार आणि त्यांची पत्नी सुशीला पवार या दांपत्यांनी हाती घेतला आहे.सरस्वती भुवन शारदा मंदिर १९९२ च्या बॅचमधील भाऊसाहेब कदम, सागर राजपूत, रवी पळसवाडीकर, राहुल बुबने, घनश्याम चौधरी, संजीव अडला कोंडा, अॅड. अभय टाकसाळ, अमोल भांडवलकर, रवींद्र साखळकर, अमित पुराणे, किरण पाटील, तृप्ती डिग्गीकर यांनी पुढे येत सुधाकर पवार यांना साथ दिली. यातील भाऊसाहेब कदम सागर राजपूत यांनी निम्म्या सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध सुद्धा दिल्यानंतर २३ एप्रिलला मंजूषा दुसाने यांच्यासह एमजीएममध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या दहा विद्यार्थिनींदेखील यासाठी परिश्रम घेत आहेत. 
 
आरोग्य केंद्रातील नॅपकिन व्हेंडिंग मशीन नावालाच 
महिलांनी नॅपकिन पॅड वापरावे यासाठी शासनाने प्रत्येक आरोग्य केंद्रात नॅपकिन व्हेंडिंग मशीन ठेवल्या. या मशीनमध्ये दहा रुपयांचा ठोकळा टाकल्यास एक नॅपकिन पॅड बाहेर येते. मात्र, शिऊर आरोग्य केंद्रात सहा महिन्यांपूर्वी मशीन्स बसवल्या असल्या तरी त्यात नॅपकिन ठेवल्या नसल्याने या मशीन्स केवळ शोभेपुरत्या उरल्या. मशीनमध्ये नॅपकिन टाकण्याचे काम शासनाने एका खासगी पुरवठा कंपनीला दिले असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे. 
 
जनजागृतीस प्रतिसाद 
- ग्रामीण भागातील महिलांत हा उपक्रम रुचेल की नाही याबाबत साशंकता होती, परंतु त्या मानाने आम्हाला चांगला प्रतिसाद लाभला. महिला मुलींनी त्यांच्या अनेक समस्या सांगत निरसन केले. -सुशीला पवार, संयोजिका कोल्ही ग्रामविकास प्रतिष्ठान 
 
-महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आशा उपक्रमाची गरज होती. या विषयावर कोणीच मोकळेपणाने बोलत नव्हते. मात्र, जनजागृती सुविधा उपलब्ध झाल्याने गावाकडच्या महिलांसाठी हे फायद्याचे ठरले आहे. -नंदा डघळे, ग्रामस्थ 
 
-छोट्या गावातील महिलांमध्ये पॅडऐवजी कापड वापरण्याची आज देखील परंपरा आहे. त्याबाबत गैरसमजुती आहेत. त्या घालवण्यासाठी जनजागृती सोबतच आम्ही गावात नॅपकिन्सची सुविधा देत आहोत. हळूहळू प्रत्येक जणी नॅपकिन्स वापरतील आणि आपल्या आरोग्याची स्वच्छतेची काळजी घेतील, असा आमचा प्रयत्न असणार आहे. -सुधाकर पवार, प्रमुख, कोल्ही ग्रामविकास प्रतिष्ठान 
 
पुढील स्लाईडवर पाहा,  ग्रामीण भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे मोफत वाटपाची फोटोज...
 
बातम्या आणखी आहेत...