आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाकर फाउंडेशनतर्फे मोफत पाठ्यपुस्तके, बुक गिफ्ट संस्थेचे सहकार्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर- ठाणे येथील प्रभाकर फाउंडेशन आणि बुक गिफ्ट या संस्थेच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील १७० विनाअनुदानित शाळांतील पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभाकर फाउंडेशनचे अध्यक्ष, उद्योगपती गिरीश घाटे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यात शासनातर्फे सर्व शिक्षा अभियानांतर्गत फक्त अनुदानित पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येतात. मात्र राज्यातील विनाअनुदानित शाळेतील मुलांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जात नाहीत. बाजारपेठेतही काहीवेळा पाठ्यपुस्तके उपलब्ध होत नव्हती. पाठ्यपुस्तकांच्या किमतीही मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे पालकांना मुलांच्या शिक्षणाचा खर्च अधिक येत होता. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी म्हणून विनाअनुदानित शाळा सुरू करण्यात आल्या. शासन मात्र अनुदानित आणि विनाअनुदानित असा भेदभाव करून ग्रामीण भागातील मुलांना पाठ्यपुस्तकांपासून वंचित ठेवत आहे. विनाअनुदानित शाळांमधील मुलांना पाठ्यपुस्तके मिळावीत म्हणून महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री यांना अनेक वेळा भेटून पाठपुरावा केला होता.
विनाअनुदानित शाळांना मोफत पाठ्यपुस्तकाबाबत शासनाचे धोरण नसल्याचे सांगून मागणी टाळण्यात आली. आमदार दत्तात्रय सावंत यांनी विनाअनुदानित शाळेतील मुलांसाठी पाठ्यपुस्तके मिळवून देण्यासाठी शिष्टमंडळासह पुणे आणि मुंबई येथील उद्योगपतींना भेटून विनाअनुदानित शाळेतील मुलांसाठी मोफत पाठ्यपुस्तक देण्याची विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन प्रभाकर फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश घाटे यांनी प्रायोगिक तत्त्वावर सोलापूर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये २०१४-१५ या शैक्षणिक वर्षासाठी मोफत पाठ्यपुस्तके पुरवली होती. २०१५-२०१६ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील १७० विनाअनुदानित शाळेतील पाचवी ते आठवीपर्यंतच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याची तयारी केली आहे. ही पुस्तके १५ जूनपर्यंत सर्व शाळांना वाटप करण्यात येणार आहेत. याबद्दल सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वर्गातून कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.
- शासनाकडून कोणत्याही विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जात नाहीत. या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके मिळावीत म्हणून महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला. प्रभाकर फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योगपती गिरीश घाटे यांनी सोलापूर जिल्ह्यातील १७० विनाअनुदानित शाळेतील पाचवी ते आठवीपर्यंतच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके देत आहेत. त्यांचा आदर्श घेऊन इतर सधन श्रीमंतांनी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावावा.”
आमदार दत्तात्रय सावंत
बातम्या आणखी आहेत...