आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत दगडाने ठेचून मित्राचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - अमली पदार्थाच्या विक्रीत सहभागी असलेल्या फजल सिकंदर पटेलने (35) त्याचा मित्र मोहंमद हुसेन खान ऊर्फ आसिफ युसूफ खान (30) याचा हसरूल परिसरात रविवारी (7 मार्च) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास दगडाने ठेचून निघृण खून केला. मृत मोहंमद हुसेन हा मौलाना आझाद महाविद्यालयासमोर आदर्श नावाचे चहाचे हॉटेल चालवत होता. दोघे मिळून परप्रांतीय तरुणांना अमली पदार्थाची विक्री करत होते व पैशाच्या वादातूनच हा खून झाल्याची चर्चा या परिसरात होती.

या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोहंमद हुसेन खान शनिवारी फजलच्या हसरूलमधील घरी गेला होता. तेथे दोघांनी येथेच्छ मद्यपान केले. त्यानंतर दोघांत बाचाबाची झाली आणि फजलने हुसेनला त्याच्या घरासमोरच जमिनीवर आडवे पाडून दगडाने ठेचून त्याला गंभीर जखमी केले. पहाटे अडीचच्या सुमारास फजलचे नातेवाईक रहीम पटेल, नसीम पटेल, आवेज पटेल यांनी त्याला जळगाव रोडवरील एम्स रुग्णालयात दाखल केले. उपचारासाठी दहा हजार रुपये जमा केले. मात्र पहाटे हुसेनची प्रकृती अधिक ढासळल्याने त्याला घाटीत पाठवण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला. प्रकरण दाबण्याच्या उद्देशाने फजलच्या नातेवाइकांनी अपघात झाल्याची नोंद पोलिसांकडे केली. मात्र, एका प्रत्यक्षदर्शीने फोन करून हुसेनच्या वडिलांना खरे कारण सांगितल्यानंतर खरा प्रकार चव्हाट्यावर आला. बेगमपुरा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा भादंवि कलम 302 नुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक सुनील तेलुरे पुढील तपास करत आहेत.


बाप-लेकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी
फजल हा सिकंदर पटेल यांचा मुलगा असून दोघा बाप-लेकांविरुद्ध पोलिस दप्तरी खून, खुनाचा प्रयत्न, अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सिकंदर पटेल यांना पंधरा दिवसांपूर्वीच एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले, तर फजलला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. मात्र न्यायालयाने त्याच्या हद्दपारीला स्थगिती दिली होती.

मतीन वाचला
विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांचा स्वयंपाकी असलेल्या एका कर्मचार्‍याचा मुलगा मतीन याला शनिवारी रात्री फजलने रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली होती. मात्र गस्त घालणार्‍या सिटी चौक पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी भांडण सोडवले व मतीनला घरी नेऊन सोडले होते. त्या वेळी पोलिसांनी फजलवर काही कारवाई केली नव्हती.