औरंगाबाद - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात यंदापासून एमएस्सी (इलेक्ट्रॉनिक्स) एमए (पुरातत्त्वविद्या) हे दोन अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीदेखील सुरू होण्याची शक्यता आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेत नुकत्याच झालेल्या विद्या परिषद व्यवस्थापन परिषद बैठकीत इलेक्ट्रॉनिक्स आणि पुरातत्त्वविद्या या दोन विषयांना मान्यता देण्यात आली.
२०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षात विद्यापीठात तीन नवीन शैक्षणिक विभाग सुरू होणार आहेत. त्यापैकी दोन विषयांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यापीठात पूर्वी एमएस्सी इलेक्ट्रॉनिक्स या विषयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण नव्हते. यंदापासून हा विभाग सुरू करण्यात आला आहे. बीएस्सी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स विषय घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी पात्र आहेत. दीनदयाळ उपाध्याय कौशल केंद्रात (सिफार्ट) हा विषय सुरू होईल. प्रवेशासाठी २२ जूनपर्यंत नावनोंदणी करता येईल. संबंधित विद्यार्थ्यांनी कौशल्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केंद्राचे संचालक डॉ. एम. डी. सिरसाट यांनी केले आहे.
‘पुरातत्त्वविद्या’चा अनोखा अभ्यासक्रम : अजिंठा,वेरूळ औरंगाबाद लेणी या जगविख्यात लेणी, देवगिरी किल्ला, मकबरा मराठवाडा ही प्राचीन भूमी असल्याची साक्ष देत आहे. औरंगाबाद विभाग ‘अ’ वर्ग पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे पुरातत्त्वविद्या अर्थात ‘अार्किऑलॉजी’चे महत्त्व ओळखून पुरातत्त्व विषयातील तज्ज्ञ डॉ. वि. ल. धारूरकर यांनी हा अभ्यासक्रम तयार केला आहे. विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ‘पुरातत्त्वविद्या’ हा विभाग सुरू करण्यात येत आहे. एमए (पुरातत्त्वविद्या) हा विषय आता लिबरल आर्ट््स विभागात फक्त २० विद्यार्थ्यांना शिकवण्यात येईल. एमए (लिबरल आर्ट््स) एमए (पुरातत्त्व विद्या) या दोन्ही अभ्यासक्रमांसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो. २८ जून रोजी प्रवेशपूर्व परीक्षा घेण्यात येईल. इच्छुकांनी लिबरल आर्ट््सचे प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांच्याशी संपर्क करावा.
हॉटेल मॅनेजमेंटसाठी मान्यतेची प्रतीक्षा
हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या विषयाला तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता मिळवण्यासाठी विद्यापीठाने प्रस्ताव पाठवलेला आहे. अद्याप मान्यतेचे पत्र मिळाले नाही. यूडीसीटीचे प्रमुख डॉ. प्रवीण वक्ते यांना या विभागाचे समन्वयक करण्यात आले असून त्यांनी अभ्यासक्रमाची रचना केली आहे. प्रशासकीय इमारतीसमोरील प्रशस्त इमारतीत हा विभाग सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. विद्यापीठ स्वायत्त संस्था असल्यामुळे तंत्रशिक्षण परिषदेच्या मान्यतेशिवायही काही वर्षे अभ्यासक्रम सुरू करू शकते. त्यामुळे यंदापासून हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी सुरू होण्याची शक्यता आहे.