आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगमधील बांधकामे आजपासून पाडणार, जेवढी बांधकाम परवानगी तेवढेच बांधकाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राजकारण्यांच्या पाठबळावर आणि मनपाच्या दुर्लक्षाच्या जिवावर पार्किंगची जागा लाटून त्यात थाटलेली दुकाने मनपा भुईसपाट करणार आहे. गुरुवारपासून मनपाची ही मोहीम सुरू होणार असून त्यात परवानगीविना बांधलेली बांधकामे पाडण्याची घोषणा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केली.

आज सर्वसाधारण सभेत सरवत बेगम यांनी विनापरवाना बांधकामांचा प्रश्न विचारला होता. त्या म्हणाल्या की, नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगी घेताना नकाशात पार्किंगसाठी जागा दाखवतात, पण एकदा परवानगी मिळाली की नकाशाप्रमाणे पार्किंग करता घरे दुकाने बांधली जातात. यामुळे वाहने रस्त्यावर उभी करावी लागतात. त्याचा वाहतुकीला त्रास होतो. अशी बेकायदा बांधकामे पाडून पार्किंगच्या जागा केव्हा मोकळ्या करणार, असा सवाल त्यांनी केला. या वेळी झालेल्या चर्चेत नगरसेवकांनी मनपाच्या नगररचना अतिक्रमण हटाव पथकाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. फेरोज खान म्हणाले की, बहुतेक बिल्डरांनी पार्किंगमध्ये बिनदिक्कत दुकाने बांधली आहेत. मनपाचे अधिकारी परवानगीनुसार बांधकामे आहेत की नाही हे तपासण्याची खबरदारीही घेत नाहीत. नंदकुमार घोडेले यांनी तर केवळ पार्किंगच नाही तर अनेक बांधकामेच बेकायदा आहेत, असे सांगितले असतो. बांधकामांवर लक्ष ठेवण्यासाठी इमारत निरीक्षक वाढवण्याची गरज आहे. याबाबत आठ, दहा पत्रे देऊनही काहीच कार्यवाही होत नाही, असा आक्षेप घेतला. यावर आयुक्त म्हणाले की, बिल्डरांनी जेवढ्या कामाची परवानगी घेतली आहे तेवढेच बांधकाम केले पाहिजे. परवानगी नसेल तर पार्किंगच्या जागा मनपा रिकाम्या करणारच आहे. यासंदर्भात मनपा उद्यापासून एक मोहीमच हाती घेणार असून जेथे जेथे असे पार्किंग लाटण्यात आले आहे तेथील बांधकाम पाडून पार्किंग मोकळे करून दिले जाईल.

यावर महापौर त्र्यंबक तुपे म्हणाले की, आतापर्यंत अशा मोहिमा धडाक्यात सुरू होतात, पण त्या पूर्ण होत नाहीत, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. त्यात काही लोक तडजोड करतात, मनपाचेही लोक त्रास देतात, असे अनुभव आले आहेत. त्यामुळे या मोहिमेत तसे होता कामा नये. पार्किंगच्या जागेतील अतिक्रमणे काढलीच गेली पाहिजेत, असेही ते म्हणाले.

या भागात होऊ शकते पाडापाडी : निरालाबाजार, उस्मानपुरा चौक ते उत्सव मंगल कार्यालय जवाहर कॉलनी, गजानन महाराज मंदिर परिसर, जवाहरनगर पोलिस स्टेशन चौकाच्या आसपासचा परिसर भागांत ही कारवाई होऊ शकते.