आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस चौकीसमोरील चार दुकाने फोडली, शनिवारी मध्यरात्री मोंढ्यात चोरट्यांनी घातला धुमाकूळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील जुन्या मोंढ्यात चोरट्यांनी शनिवारी रात्री धुमाकूळ घातला. एकाच वेळी ओळीने चार दुकाने फोडून दोन लाखांचा माल लांबवला. अवघ्या पंधरा फुटांवर असलेल्या पोलिस चौकीजवळ हा प्रकार घडला. याबाबत रविवारी रात्री उशिरापर्यंत क्रांती चौक ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.
शनिवारी रात्री दुकाने बंद करून दुकानदार घरी गेल्यानंतर चोरट्यांनी चार दुकानांपैकी एका दुकानाच्या छताचा पत्रा कटरने कट करून आत प्रवेश केला. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यांची तोडफोड करण्यात आली. कॅमेरे तोडताना एका चोरट्याचा चेहरा कॅमे-यात कैद झाला असल्याचे दुकान मालकाने पोलिसांना सांगितले.

एकापाठोपाठ चार दुकाने फोडली : सर्वप्रथम चोरट्यांनी हरिनारायण सोमाणी यांचे किराणा दुकान फोडून किराणा लंपास केला. त्यानंतर लक्ष्मी ट्रेडर्स फोडले. मात्र हाती काहीही न लागल्याने त्यांनी संजयकुमार कांकरिया यांचे दुकान फोडून सीसीटीव्ही कॅमे-याची तोडफोड केली. गल्ल्यातील सहा हजार रुपये व सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू, किराणा चोरून नेला.
आवारातील चोर असण्याची शक्यता : चोरट्यांना मोंढ्यातील दुकानांची खडान‌्खडा माहिती होती. दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे कुठे लावले आहेत. मौल्यवान वस्तू कुठे ठेवल्या आहेत. दुकानात शिरण्यासाठी कुठून जागा आहे. हे माहिती असणारेच लोक अशा प्रकारे चोरी करु शकतात. यावरून हे चोरटे मोंढा परिसरातीलच असतील असा संशय मोंढ्यातील व्यापाऱ्यांना व पोलिसांना आहे.

चोरट्यांनी उशीच्या खोळीत नेले सामान
अवघ्या दीड फुटाच्या व्हेंटिलेशन खिडकीतून चोरटे संजयकुमार ट्रेडर्समध्ये शिरले आणि दुकान साफ केली. सामान नेण्यासाठी त्यांनी उशीच्या खोळीचा वापर केला. चोरांनी केशर, लेझर ब्लेड, मिठाईला लावण्यात येणारे चांदीचे कव्हर, सौंदर्य प्रसाधने आणि रोख रक्कम चोरट्यांनी पळवली. रविवारी रात्री साडेआठपर्यंत ह्यदिव्य मराठीह्णच्या प्रतिनिधीने या चौकीची पाहणी केली असता रविवारी रात्री चौकीत कोणीही नव्हते.
रविवारी प्रकरण उघडकीस
रविवारी सकाळी दुकाने फोडल्याचे व्यापाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब क्रांती चौक पोलिसांना कळवली. पोलिसांसह श्वानपथक व ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला. तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
धक्कादायक प्रकार
शहरातल्या जुन्या मोंढ्यात एकाच वेळी चार दुकाने फोडली जातात हा प्रकार गंभीर आहे. पोलिसांनीदेखील हा प्रकार गांभीर्याने घ्यायला हवा. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज आहे. संजय कांकरिया, संचालक, संजय ट्रेडर्स .