आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांची फसवणूक करून चैनीवर उडवले दोन लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हातावर पोट असणाऱ्या दोन हजार महिलांची दहा लाखांची फसवूक करून लक्ष्मण केंद्रे या भामट्याने दोन दिवसांत दोन लाख रुपये चैनीवर खर्च केल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून तो फरार आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात फसवणूक झालेल्या महिलांनी तक्रार दिली आहे. मात्र, दोन दिवस झाले तरी गुन्हा दाखल झाला नसल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केल्यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

घरगुती कामातून महिलांना चांगला मोबदला मिळेल, असे आमिष दाखवून लक्ष्मण केंद्रे याने सुमारे दोन हजार महिलांची फसवणूक केली. याबाबतची तक्रार या महिलांनी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात केली होती. मात्र, केंद्रेबद्दल कागदोपत्री गुन्हा दाखल करण्यासाठी कोणताही पुरावा नसल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही. तक्रार अर्जातदेखील काही तांत्रिक त्रुटी असल्याचे सांगितले जात आहे. तरीही त्याला पकडून आणण्यासाठी पोलिसांचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणातील संशयित समजल्या जाणाऱ्या शंकर पतंगे याचीदेखील केंद्रेने फसवणूक केली असल्याची माहिती उपनिरीक्षक मधुकर शिंदे यांनी दिली.

बँकेतून काढले सहा लाख रुपये ...
लक्ष्मण केंद्रेने महिलांची तब्बल दहा लाखांची फसवणूक केली. मात्र, अांबटशौकीन असलेल्या केंद्रेने सुमारे दोन लाख रुपये मौजमजेवर खर्च केल्याचेदेखील पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. तर दोन लाख कच्च्या मालासाठी आणि उर्वरित सहा लाख त्याने बँकेतून काढले असल्याची माहिती पोलिसांनी बँकेकडून मिळवली आहे. केंद्रे औरंगाबादेतून फरार झाल्यानंतर नांदेडला गेला तेथून हैदराबादला गेल्याचे स्पष्ट आहे. मात्र, तो सध्या कुठे आहे, याचा पोलिस शोध घेत आहेत.

अय्याशी लक्ष्मण...
लक्ष्मणनेमहिला-मुलींना पैशांचे आमिष दाखवून काम दिले होते. या वेळी त्याच्याकडे काम करणाऱ्या काही महिला मुलींचे त्याने लैंगिक शोषणदेखील केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरातून पळून जाताना त्याने मुकुंदवाडी परिसरातील संजयनगर येथील एका महिलेला हैदराबादपर्यंत सोबत नेले असल्याचे कळते.

नांदेडमध्येही केली फसवणूक
केंद्रेनेया फसवणूक प्रकरणातील शंकर पतंगे याला, मी नांदेड येथेदेखील शाखा सुरू करत आहे. तुला त्या ठिकाणी मॅनेजर करतो, असे आमिष दाखवले होते. त्यानुसार पतंगेने त्याचा नातेवाईक असलेल्या अशोक लोंढेला तेथील महिलांना या व्यवसायाची माहिती देऊन डिपॉझिट जमा करण्यास सांगितले होते. मात्र, लक्ष्मण नांदेड येथे जमा झालेले पैसेदेखील घेऊन पळाल्याची तक्रार तेथील पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...