आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुरी नसताना ४० लाखांच्या कामाचे पाडले चार तुकडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: सार्वजनिक बांधकाम विभागातील सात अभियंत्यांनी केलेल्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी पथक शहरात आलेले असतानाच या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणखी एक नवा प्रताप केला आहे. संरक्षक भिंत इमारतींच्या किरकोळ दुरुस्तीवर ४० लाख रुपये खर्च केल्याचे दाखवून मार्चच्या बजेटमध्ये धनादेश काढण्याचा प्रकार केला आहे. तांत्रिक मान्यतेपूर्वीच या कामाचे नियमबाह्य चार तुकडे पाडून काम वाटप करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

२०१४-१५ या वर्षासाठी आलेला निधी परत जाऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने एन- मधील भक्ती गणेश मंदिराशेजारच्या आरोग्य कुटुंबकल्याण प्रशिक्षण केंद्राच्या निवासस्थान परिसर नूतनीकरण सरंक्षण भिंतीच्या बांधकामास २८ जानेवारी २०१५ रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली. ही मान्यता देताना अधीक्षक अभियंता यू. के. आहेर यांनी वेगवेगळ्या बारा अटी शर्थी टाकल्या. यामध्ये क्रमांक पाचच्या अटीत स्पष्ट केले की, एका इमारतीसंदर्भात त्या इमारतीमधील सर्व मंजूर कामांचे एक अंदाजपत्रक तयार करावे. तद्नंतर एक निविदा निश्चिती करावी या कामाचे तुकडे पाडून भागश: ठेकेदार निश्चित करू नये.

अधीक्षक अभियंत्यांचे असे लेखी आदेश असतानाही कार्यकारी अभियंत्यांनी तांत्रिक मंजुरीपूर्वीच म्हणजेच २३ जानेवारी २०१५ रोजी या कामांचे चार तुकडे पाडले. हे काम सुमीत श्रद्धा मजूर सहकारी संस्थांना देऊन टाकले. सध्या या ठिकाणी केवळ सरंक्षण भिंतीचे काम सुरू असताना अभियंत्यांनी काम पूर्ण झाल्याची नोंद मोजमाप पुस्तिकेत घेऊन धनादेशासाठी बिल लेखा विभागाकडे सादरही केले आहे.

कामदहा लाखांचे, दाखवले मात्र ४० लाख रुपये
मार्चपूर्वीकाम झाल्याचे दाखवून बिले काढण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग अग्रेसर असतोच. मात्र, कोणाचे लक्ष नाही या भ्रमात राहत कार्यकारी अभियंत्यांनी दहा लाखांचे काम चक्क ४० लाखांचे दाखवत बोगस बिल काढण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. भक्तीनगर परिसरात असलेली निवासस्थाने आजही सुस्थितीत असून त्यावर काहीच दुरुस्ती करण्याची गरज नसल्याचे दिसते. संरक्षण भिंतीचे काम केल्यावर इमारतीवरही खर्च केल्याचे दाखवून ही ४० लाखांची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. या नियमबाह्य कामासंदर्भात मुख्य अभियंता एकनाथ उगिले अधीक्षक अभियंता यू. के. आहेर यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही. शेवटी एसएमएसद्वारे त्यांनी बाजू मांडावी, अशी विनंतीही करण्यात आली, तरीही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
धनादेश दिले नाहीत..
कामपूर्ण झाले नसून त्या कामाचे बिल आले आहे. मात्र, त्यांना धनादेश देण्यात आलेला नाही. अधिक माहिती आपण वरिष्ठांकडून घ्यावी, असे सार्वजिक बांधकाम विभागाचे लेखाधिकारी लांजेवार म्हणाले.